दोन दिवसात रस्ते झाले खड्डे मुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 11:01 PM2019-07-12T23:01:37+5:302019-07-12T23:02:33+5:30
तालुक्यातील आमगाव-कामठा मार्गाची अंत्यत दुर्दशा झाली होती. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने अपघातांच्या संख्येत सुध्दा वाढ झाली होती. मागील दोन वर्षांपासून याकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले होते. दरम्यान पालकमंत्री परिणय फुके यांनी दखल घेत या रस्त्याची दुरूस्ती व खड्डे बुजविण्याचे निर्देश दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : तालुक्यातील आमगाव-कामठा मार्गाची अंत्यत दुर्दशा झाली होती. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने अपघातांच्या संख्येत सुध्दा वाढ झाली होती. मागील दोन वर्षांपासून याकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले होते. दरम्यान पालकमंत्री परिणय फुके यांनी दखल घेत या रस्त्याची दुरूस्ती व खड्डे बुजविण्याचे निर्देश दिले.त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेत रस्त्यावरील खड्डे दोन दिवसात बुजविले. दोन वर्षांपासूनची समस्या दोन दिवसात मार्गी लागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
आमगाव ते कामठा मार्गापैकी एक २ किमी रस्ता व दुसरा ३ किमीचा रस्ता मागील दोन वर्षांपासून पूर्णपणे उखडला होता. यामुळे या मार्गावरुन ये-जा करणाऱ्या वाहन चालक आणि नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. या रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी नागरिकांनी अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने निधीचे कारण पुढे करीत याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे रस्त्याची समस्या कायम होती.
सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री परिणय फुके यांनी नागरिकांच्या समस्येची दखल घेतली. त्यांनी लगेच आपल्या स्वीय सहायकाला पाठवून याचा पाठपुरावा करण्यास सांगितले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता व स्वीय सहायकाला सदर रस्त्याची पाहणी करण्यास पाठविले. तसेच दोन दिवसात रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे निर्देश अभियंत्याला दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम त्वरीत सुरू केले.
या रस्त्याची दुरूस्तीचा प्रस्ताव तयार करुन पाठविण्याचा सूचना देखील पालकमंत्री फुके यांनी अधिकाऱ्यांना केल्या. फुके यांनी रस्त्याच्या समस्येची दखल घेतल्याने दोन दिवसांची समस्या दोन दिवसात मार्गी लागल्याने आमगाव तालुक्यातील नागरिकांनी फुके यांचे आभार मानले.