विनाअनुदानित तंत्रशिक्षण कर्मचाऱ्यांच्या आशा पल्लवित
By admin | Published: January 10, 2016 01:59 AM2016-01-10T01:59:32+5:302016-01-10T01:59:32+5:30
राज्यभरातील कायम विनाअनुदानित उच्च व तंत्रशिक्षण पदविका व पदवी, पदव्युत्तर महाविद्यालयांना अनुदान देण्याच्या २८ वर्षांपासूनच्या मागणीवर तोडगा काढण्याचे आश्वासन ...
मुख्यमंत्र्यांना निवेदन : तावडेंनी दिले बैठक घेण्याचे आश्वासन
आमगाव : राज्यभरातील कायम विनाअनुदानित उच्च व तंत्रशिक्षण पदविका व पदवी, पदव्युत्तर महाविद्यालयांना अनुदान देण्याच्या २८ वर्षांपासूनच्या मागणीवर तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. यासंदर्भात स्वत:च्या रक्ताने निवेदन लिहून ते मुख्यमंत्र्यांना सोपविल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिले.
राज्यातील कायम विनाअनुदानित उच्च व तंत्रशिक्षण महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सेवेत कायम करण्यासोबत अनुदान देण्याची मागणी शासनाकडे करीत आहेत. राज्य शासनाच्या कुशल तंत्रज्ञ निर्माण करण्याच्या धोरणात कायम विनाअनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे. असे असताना या कर्मऱ्यांना अपुरे वेतन मिळत असल्याने त्यांना बिकट आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.
आपल्या मागण्यांसाठी हे कर्मचारी गेल्या २८ वर्षांपासून लढा देत आहेत. पण त्यावर तोडगा निघत नसल्याने राज्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष यशवंत मानकर यांनी स्वत:च्या रक्ताने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विधान भवनात हे निवेदन सोपविले. त्या निवेदनाचे अवलोकन करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी आ.संजय पुराम, अॅड.यशुलाल उपराडे, राकेश शेंडे, दिनेश वंजारी, अजय पाठक आदी उपस्थित होते.
यावेळी सदर शिष्टमंडळाने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांचीही भेट घेतली. त्यांनी उच्च व तंत्रशिक्षण महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या अनुदानाच्या मागणीसंदर्भात संघटना व शासन स्तरावरील बैठक लवकरच घेण्यात येईल आणि अनुदानासंदर्भात तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन दिले. (शहर प्रतिनिधी)