अंगणवाडीतील ९ हजार चिमुकले आधारविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:51 AM2017-07-18T00:51:19+5:302017-07-18T00:51:19+5:30
आधार हे सर्वांचे हक्क व सर्वांना बंधनकारक असे धोरणच शासनाने राबविले आहे. त्यानुसार सर्वांनाच आधारकार्ड नोंदणी करणे गरजेचे झाले आहे.
१७९७ अंगणवाड्या : ९१ टक्के चिमुकल्यांची आधार कार्ड नोंदणी
कपिल केकत । लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आधार हे सर्वांचे हक्क व सर्वांना बंधनकारक असे धोरणच शासनाने राबविले आहे. त्यानुसार सर्वांनाच आधारकार्ड नोंदणी करणे गरजेचे झाले आहे. अशात जिल्ह्यात ९७.३३ टक्के लोकांची नोंदणी झाली असतानाच जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रात जाणाऱ्या ० ते ६ वर्षे वयोगटातील ९ हजार ०६४ चिमुकल्यांची अद्याप नोंदणी झालेली नसल्याची माहिती आहे. यामुळे या चिमुकल्या आधारकार्डविनाच आहेत. मात्र अंगणवाडीतील ९१.११ टक्के चिमुकल्यांची आधारकार्ड नोंदणी झाली आहे.
आज प्रत्येकच कामासाठी शासनाने आधारकार्ड असणे गरजेचे केले आहे. आधारकार्ड क्रमांकावरूनच आता त्या व्यक्तीची ओळख होऊ लागली आहे. यात आता चिमुकल्यांनाही त्यांची ओळख मिळावी यासाठी त्यांनाही आधारकार्ड काढणे गरजेचे झाले आहे. यासाठी शासनाकडून ठिकठिकाणी शिबिरे लावून आधारकार्ड नोंदणी करण्यात आली. या अंतर्गत अंगणवाडीत जाणाऱ्या ० ते ६ वर्षे वयोगटातील चिमुकली सुटू याचीही खबरदारी घेण्यात आली. मात्र जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांतील ९ हजार ६४ चिमुकल्यांची अद्यापही आधार नोंदणी झालेली नाही.
प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यातील १ हजार ७९७ अंगणवाड्यांत ० ते ६ वर्षे वयोगटातील १ लाख १ हजार ९३२ चिमुकल्यांची नोंद आहे. यातील ९२ हजार ८६८ चिमुकल्यांची आधारकार्ड नोंदणी झाली आहे. त्याची ९१.११ एवढी टक्केवारी असतानाच ९ हजार ६४ चिमुकले मात्र आधार शिवायच आहेत. आता यासाठी आधारकार्ड शिबिर घेतले जात नसल्याचे कारण म्हणता येईल.
शिवाय काही चिमुकल्यांच्या पालकांचेच आधारकार्ड काढण्यात आलेले नाही. त्यामुळे मुलांचेही आधारकार्ड अद्याप काढण्यात आलेले नाही. तसेच १ ते ६ वर्षांच्या चिमुकल्यांचे आधारकार्ड काढले जात असतानाच नवजात बाळांचे आधारकार्ड काढता येत नसल्यानेही १०० टक्के नोंदणी झाली नसल्याचे कारण यंत्रणेकडून सांगितले जात आहे.
गोरेगाव तालुका अव्वल
जिल्हावासीयांच्या आधारकार्ड नोंदणीत अर्जुनी-मोरगाव व आमगाव तालुका अग्रेसर असतानाच ० ते ६ वर्षे वयोगटातील अंगणवाडीतील चिमुकल्यांच्या नोंदणीत गोरेगाव तालुका अव्वल ठरला आहे. गोरेगाव तालुक्यातील २०४ अंगणवाडीतील १० हजार ६७१ चिमुकल्यांपैकी १० हजार २६१ चिमुकल्यांची आधार नोंदणी झालेली असून त्याची ९६.१६ एवढी टक्केवारी आहे. तर त्यानंतर आमगाव तालुका दुसऱ्या क्रमांकावर असून येथे १७८ अंगणवाड्यांतील १० हजार ९४१ चिमुकल्यांपैकी १० हजार ३७२ चिमुकल्यांची नोंदणी झाली असून त्याची ९४.३७ एवढी टक्केवारी असल्याची माहिती आहे. तर सर्वात कमी नोंदणी तिरोडा तालुक्यात करण्यात आली आहे. येथे २०६ अंगणवाड्यांतील १२ हजार ९२५ चिमुकल्यांपैकी ११ हजार १३८ चिमुकल्यांची नोंद करण्यात आली असून त्याची ८६.१७ एवढी टक्केवारी आहे.