गांधर्व विवाहानंतर चार महिन्यांतच संपविली जीवनयात्रा; पतीसह जाऊला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2022 10:37 AM2022-02-19T10:37:28+5:302022-02-19T12:30:45+5:30
धर्मेंद्र यांनी ४ महिन्यांपूर्वी दीपालीशी लग्न केले होते. मात्र, पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर धर्मेद्र आणि वहिनी प्रीती मेहर यांच्यात असलेले अनैतिक संबंध दीपालीला माहिती झाले.
आमगाव (गाेंदिया) : ठाणा येथील दीपाली मेहर (३०) या महिलेने गळफास घेत बुधवारी (दि.१६) आत्महत्या केल्याने गावात खळबळ उडाली आहे. चार महिन्यांपूर्वीच त्यांचा धर्मेंद्र मेहर यांच्याशी गांधर्व विवाह झाला होता. मात्र, दीपालीची आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप दीपालीच्या कुुटुंबीयांनी केला. यावर पोलिसांनी दीपालीचा पती धर्मेंद्र मेहर आणि जाऊ प्रीती मेहर या दोघांना अटक केली आहे.
धर्मेंद्र मेहर हे एका नामांकित महाविद्यालयात प्राध्यापक असून, त्यांच्या पहिल्या पत्नीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे धर्मेंद्र यांनी ४ महिन्यांपूर्वी दीपालीशी लग्न केले होते. मात्र, पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर धर्मेद्र आणि वहिनी प्रीती मेहर यांच्यात असलेले अनैतिक संबंध दीपालीला माहिती झाले. त्यातून होणाऱ्या मानसिक त्रासाबाबत दीपालीने आपल्या घरच्या मंडळींना माहिती दिली असल्याचे दीपालीच्या कुटुंबीयांनी सांगितले. यामुळेच ती माहेरी आली होती व ४ दिवसांपूर्वीच धर्मेद्र दीपालीला माहेरहून ठाणा येथे घेऊन आला होता. परंतु, दोघांमध्ये पुन्हा भांडण होत असल्याचे दीपालीने आपल्या माहेरी सांगितले होते. यावर घरच्या मंडळींनी दीपालीला फोनवर धीर दिला. मात्र, दीपालीला राग अनावर झाल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. तिच्या कुटुंबीयांनी आत्महत्या नसून, हत्या असल्याचा आरोप केला आहे.
आराेपींना दाेन दिवसांची पाेलीस काेठडी
यासंदर्भात पोलिसांनी तपासचक्रे फिरविली. दीपालीच्या कुटुंबीयांकडून नोंदविलेल्या बयाणांतून पोलिसांनी प्राध्यापक धर्मेंद्र मेहर आणि वहिनी प्रीती मेहर यांना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना गुरुवारी (दि.१७) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दीपालीच्या कुटुंबीयांनी आत्महत्या नसून ही हत्या असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाचे गूढ कायम असून, तपसानंतर सत्य काय ते उजेडात येईलच.