महिलेने लावला लाखो रुपयांचा चुना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:33 AM2021-08-12T04:33:09+5:302021-08-12T04:33:09+5:30
आमगाव : अधिक व्याजाचे आमिष दाखवून आमगाव तालुक्यातील एका वाॅर्डातील महिलेने शंभरपेक्षा अधिक महिला व पुरुष कर्मचाऱ्यांची लाखो रुपयांची ...
आमगाव : अधिक व्याजाचे आमिष दाखवून आमगाव तालुक्यातील एका वाॅर्डातील महिलेने शंभरपेक्षा अधिक महिला व पुरुष कर्मचाऱ्यांची लाखो रुपयांची रोख घेऊन पसार झाल्याची चर्चा आमगाव शहरात सुरू होती. विशेष म्हणजे ही महिला फक्त १० वीपर्यंत शिकली असून, तिने नातेवाइकांनासुद्धा गंडा घातल्याची बाब उघडकीस आली आहे.
ही महिला वाॅर्डातील महिलांना व पुरुषांना वेगवेगळे कारण सांगून रुपये मागायची व व्याजासहित रक्कम परत करण्याची हमी द्यायची. सुरुवातीला कित्येक जणांना व्याजासह रक्कम परत दिली. अशाप्रकारे विश्वास जिंकून रुपये मागून परत करायची. अशाप्रकारे विश्वास जिंकून झाल्यानंतर मोठी रक्कम मागायला सुरुवात केली आणि कित्येकांनी दिलेही. काही महिलांनी आपले दागिनेही तिच्याकडे ठेवले. हळूहळू या महिलेने व्याजाची रक्कम किंवा मूळ रक्कम उद्या देतो, परवा देतो असे कारण सांगून वेळ मारून न्यायची. परंतु काहींनी वारंवार विचारपूस केली असता, उडवाउडवीची उत्तरे ही महिला देऊ लागली. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. परंतु पुरावा नसल्याने तक्रार कुणीही केली नाही. पैशांबाबत वारंवार विचारणा होऊ लागल्याने अखेर महिलेने घर सोडून पळ काढला. महिलेच्या नवऱ्याला व कुटुंबातील व्यक्तीला फसवणूक झालेल्यांनी विचारले असता कोठे गेली, हे आपल्याला माहिती नसल्याचे सांगत हात वर केले. ही महिला रुपये घेऊन पसार झाल्याचे वाॅर्डातील महिला-पुरुषांना कळताच पोलीस स्टेशनला धाव घेतली. आपल्यावर घडलेला प्रकार सांगितला.
...........
दोन-तीन वर्षांपासून सुरू होता प्रकार
पोलिसांनी अवघ्या काही तासांत या महिलेचा शोध घेतला. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. हा प्रकार मागील दोन-तीन वर्षांपासून सुरू असल्याची माहिती फसवणूक झालेल्या काही महिलांनी सांगितली आहे. फसवणूक झालेल्यांमध्ये जास्तीत जास्त महिलांचे प्रमाण अधिक आहे. इतक्या वर्षांपासून ही महिला शंभरच्या जवळपास व्यक्तींना गंडा घातला, तरीही कुणीही आतापर्यंत तक्रार का दिली नव्हती, हा चर्चेचा विषय आहे. एकटी महिला हा प्रकार करू शकत नाही, कुठेतरी धागेदोरे असल्याबाबत वॉर्डात चर्चा सुरू आहे. बातमी लिहीपर्यंत कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. फसवणूक झालेल्यांच्या तक्रारीवरून आमगाव पोलिसांनी तपास सुरू केला आहे.