महिलाशक्तीपुढे उभी बाटली झाली आडवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 10:21 PM2018-08-25T22:21:20+5:302018-08-25T22:22:24+5:30
तालुक्यातील तुमखेडा येथील महिलांनी गावात दारूबंदी करण्यासाठी एल्गार पुकारला होता. यासाठी शनिवारी (दि.२५) मतदान घेण्यात आले. सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : तालुक्यातील तुमखेडा येथील महिलांनी गावात दारूबंदी करण्यासाठी एल्गार पुकारला होता. यासाठी शनिवारी (दि.२५) मतदान घेण्यात आले. सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. यात गावातील ६४० मतदारांनी दारूबंदीच्या बाजुने मतदान केल्याने महिलाशक्तीपुढे उभी बाटली आडवी झाली. त्यामुळे गावात दारुबंदीचा मार्ग मोकळा झाला. मतमोजणीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर महिलांनी एकच जल्लोष केला. मागील महिनाभरापासून उभारलेल्या लढ्याला यश आल्याचा आंनद व्यक्त केला.
तुमखेडा येथील महिलांनी गावात दारुबंदी करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली. त्यासाठी शनिवारी (दि.२५) मतदान घेण्यात आले. गावातील एकूण १०५२ मतदारांपैकी ७४० मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. यात मतमोजणीनंतर दारुबंदीसाठी एकूण ६३६ मतदारांनी मतदान केले. तर दारुबंदीच्या विरोधात ५४ जणांनी मतदान केले. तर ५० मते अवैध ठरली. एकूृण झालेल्या मतदानात सर्वाधिक ६३६ मतदान दारुबंदीच्या बाजुने झाले. त्यामुळे दारुबंदीसाठी आवश्यक मतदानापेक्षा अधिक मतदान झाल्याने तुमखेडा येथे दारूबंदी करण्याचा ठराव पारित झाला. दारुबंदीसाठी आडवी बाटली आणि दारुबंदीच्या विरोधात उभी बाटल अशा मतपत्रिका ठेवण्यात आल्या होत्या. अखेर गावातील महिला शक्ती आणि मागील महिनाभरापासून महिलांनी यासाठी उभारलेल्या लढ्याला यश आले. निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदा अरविंद हिंगे व नायब तहसीलदार एन.एम.बेदी व राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक आर.एन.सिंगर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक घेण्यात आली. सायंकाळी ७.४५ वाजता तहसीलदार हिंगे यांनी मतमोजणीचा निकाल जाहीर केला. दारुबंदीच्या बाजुने सर्वाधिक ६३६ मतदान झाल्याचे जाहीर केले. तसेच तुमखेडा येथे दारुबंदी करण्याचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान निकाल जाहीर होताच महिलांनी एकच जल्लोष केला. गावातील अनेक कर्ते पुरूष दारुच्या आहारी गेल्याने अनेकांचे कुटुंब उध्दवस्त झाले. तर काहींचे होण्याच्या मार्गावर होते. दरम्यान गावातील महिलांनी एकत्र होत या विरुध्द एल्गार पुकारल्याने बऱ्याच महिलांना दिलासा मिळाला.
हा महिलाशक्तीचा विजय
गावातील अनेक पुरूष दारुच्या व्यसनाच्या आहारी गेल्याने अनेक कुटूंबाची वाताहत झाली. अनेक महिलांवर यामुळे संकट ओढवले. दरम्यान तुमखेडा येथील महिलांनी एकत्र येत या विरुध्द एल्गार पुकारला. अखेर गावात दारुबंदीचा करण्याचा मार्ग मतदानानंतर मोकळा झाला आहे. त्यामुळे हा खऱ्या अर्थाने तुमखेडा येथील महिला शक्तीचा विजय आहे.
- अॅड. सविता बेदरकर, सामाजिक कार्यकर्त्या.
जनजागृतीचे फलित
तुमखेडा खुर्द येथे दारुबंदी करण्यासाठी गावातील महिलांनी महिनाभरापासून कंबर कसली होती. गावात रॅली काढून, दवंडी देऊन दारुबंदीसाठी जनजागृती केली. दारुबंदीचे महत्त्व महिलांना पटवून दिले. या जनजागृतीचे फलित शनिवारी झाले.