कमरगाव येथे महिलेचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 10:59 PM2019-07-12T22:59:10+5:302019-07-12T22:59:52+5:30
तालुक्यातील कमरगाव येथील एका ३१ वर्षीय विवाहित महिलेची एकाने कुटुंबातील सदस्यांच्या संगनमताने खून केल्याची घटना आज (दि.१२) सकाळी ९ वाजता कमरगाव येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी कुटुंबांतील सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : तालुक्यातील कमरगाव येथील एका ३१ वर्षीय विवाहित महिलेची एकाने कुटुंबातील सदस्यांच्या संगनमताने खून केल्याची घटना आज (दि.१२) सकाळी ९ वाजता कमरगाव येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी कुटुंबांतील सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. स्वाती योगेश रहांगडाले (३१) रा. करमरगाव असे खून झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वाती शुक्रवारी सकाळी घराच्या मागील वाडीत काम करीत असताना आरोपीने घरगुती वादावरुन लोखंडी फावड्याने चेहऱ्यावर डोक्यावर मारुन खून केला. स्वाती शेतीचे काम करीत नाही या कारणावरुन कुटुंबातील सदस्य स्वातीला मानसिक त्रास देत असल्याचा आरोप आहे.
यासंदर्भात पोलिसांनी सात पैकी चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे. यातील योगेश गुलाबचंद रहांगडाले (पती), गुलाबचंद चैतराम रहांगडाले, भिमराव गुलाबचंद रहांगडाले, गुणेश्वर गुलाबचंद रहांगडाले, सीमा भिमराव रहांगडाले, सरीता गुणेश्वर रहांगडाले, पार्वता गुलाबचंद रहांगडाले या सात जणांवर पोलिसांनी तक्रारीवरुन भांदवीच्या कलम ३०२, ४९८ (अ), ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्ष एस. डी. दसूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
कमरगाव येथे तणावपूर्ण शांतता
तालुक्यातील कमरगाव येथे १२ जुलैला सकाळपासून तणावपूर्ण शांतता होती. गावात सकाळपासून नागरिकांची गर्दी पहायला मिळाली. कुठेही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस विभागाने अतिरिक्त कुमक मागविली होती. स्थानिक गोरेगाव पोलीस स्टेशन हद्दीतही नागरिकांनी गर्दी केली होती. सर्व आरोपींना अटक करुन गुन्हे दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली होती.