महिलांना टाइप २ मधुमेहाचा धोका ! महत्वाचे कारणे कोणते?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 03:51 PM2024-10-08T15:51:46+5:302024-10-08T15:53:03+5:30
महिलांनी वेळीच काळजी घेणे गरजेचे : नियमित व्यायाम व आहाराने टाळा धोका
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सध्याची जीवनशैली कमालीची बदलल्याने आजारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अनियमित आहार, दीर्घकाळ बैठे काम, कमी चालणे, व्यायाम न करणे या सवयी अनेक आजारांना खुले आमंत्रण देण्यासारख्या आहेत.
या आमंत्रणामुळे मधुमेहाचा विकार जडण्याचे प्रमाण वाढत आहे. जे लोक जास्त गोड खातात त्यांना मधुमेह हमखास होतो. पण, या आजाराला आपली आळशी जीवनशैलीही तितकीच कारणीभूत आहे.
लक्षणे काय ?
टाइप-२ मधुमेह असलेल्या लोकांना बऱ्याच वर्षांपासून लक्षणे दिसत नाहीत. त्यांची लक्षणे कालांतराने हळूहळू विकसित होतात. यामध्ये खूप तहान लागणे, थकवा येणे, वारंवार लघवी होणे, अचानक वजन कमी होणे, जखम बरी न होणे ही याची प्रमुख लक्षणे असल्याचे वैद्यकीय अधिकारी सुजाता उमेश ताराम यांनी सांगितले.
काय काळजी घ्याल?
टाइप २ मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी न चुकता व्यायाम करणे गरजेचे आहे. शिवाय गोड पदार्थांवर नियंत्रण आणावे. नियमित वेळेवर सकस आहार घेणे गरजेचे आहे.
कारणे काय ?
व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा, पाळीच्या तक्रारी, पीसीओडी, थायरॉइडचे विकार ही टाइप-२ मधुमेह होण्याची प्रमुख कारणे आहेत. महिलांमध्ये लठ्ठपणाचा विकार अधिक प्रमाणात आढळून येत आहे.
"तळलेले, मसालेदार पदार्थ खाण्याची आवड असेल, तुमचे काम सतत बसण्याचे असेल, तुम्ही कमी चालत असाल, तुम्हाला उच्च रक्तदाब असेल, कुटुंबातील कोणाला मधुमेह असेल, तुम्ही व्यायाम करीत नसाल किंवा तुम्ही चालत नसाल तर तुम्हाला मधुमेहाचा उच्च धोका उद्भवू शकतो. अलीकडच्या काळात महिलांना टाइप-२ मधुमेहाचा धोका अधिक आढळून येतो."
- सुजाता उमेश ताराम, वैद्यकीय अधिकारी डोंगरगाव (सावली).