राखी व्यवसायातून महिला होताहेत आत्मनिर्भर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:10 AM2021-08-02T04:10:37+5:302021-08-02T04:10:37+5:30

सौंदड : चूल आणि मूल या मानसिकतेच्या पलीकडे जाऊन येथील महिला आता आत्मनिर्भरतेचे धडे गिरवू लागल्या आहेत. ...

Women are becoming self-reliant in Rakhi business! | राखी व्यवसायातून महिला होताहेत आत्मनिर्भर!

राखी व्यवसायातून महिला होताहेत आत्मनिर्भर!

Next

सौंदड : चूल आणि मूल या मानसिकतेच्या पलीकडे जाऊन येथील महिला आता आत्मनिर्भरतेचे धडे गिरवू लागल्या आहेत. युवा नेटवर्क मैत्री मंचच्या माध्यमातून त्यांना कच्चा माल पुरवून प्रशिक्षण दिल्यानंतर या महिलांनी आकर्षक राख्या तयार केल्या आहेत. लवकरच त्यांची प्रदर्शनीदेखील भरवण्यात येणार असून विक्रीसाठी या आकर्षक राख्या बाजारात उपलब्ध होणार आहेत.

५ नोव्हेंबर २०१६ रोजी रोशन शिवणकर यांनी युवा नेटवर्क मैत्री मंचची स्थापना करून महिलांना एकत्र केले. त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा म्हणून प्रयत्न सुरू केले. सन २०१६ पासून विविध सामाजिक उपक्रम व सेवाभावी कार्ये मंचच्या माध्यमातून करण्यात येतात. याचाच एक भाग म्हणजे मंचच्या संयोजिका गायत्री इरले यांनी महिलांच्या हाताला काही काम मिळावे म्हणून पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून राखी तयार करण्याचा मानस व्यक्त केला. त्यांचे मत सर्वांना पटले व ना नफा ना तोटा या तत्त्वावर काम करण्याचा निर्धार केला.

राखी तयार करण्याकरिता कच्चा माल खरेदी करण्यासाठी ३० हजार रुपये व राखी पॅकिंग साहित्याकरिता १० हजार रुपये अशी ४० हजार रुपयांची गुंतवणूक शिवणकर यांनी केली. यापुढेदेखील महिलांना वर्षभर काम मिळावे, याकरिता नियोजन केले जात आहे. मंचच्या सदस्यांद्वारे राख्या तयार करण्यात आल्या असून पॅकिंग करण्याचे काम सुरू आहे. लवकरच गावातील काही ठरावीक ठिकाणी प्रदर्शनी लावून ज्या किमतीत राखी तयार झाली, त्याच किमतीत गावातील महिलांना विक्री करण्यात येईल. यासाठी मंचच्या मार्गदर्शक मीनाक्षी विठ्ठले, तालुका सचिव सुदेक्षणा राऊत, शहर सचिव दुर्गा इरले, सुरेखा नंदरधने, कोषाध्यक्ष ज्योती बर्वे, शालू भैसारे, लता हटकर, मनीषा निंबेकर, कीर्ती कडुकार, मंजिरी इरले, अंजू इरले, नलिनी सावरकर, प्रिया राऊत, सुषमा डोये, माधुरी यावलकर, कल्पना गायधने, सुरेखा निंबेकर या सहकार्य करीत आहेत.

--------------------------------

विविध उपयोगी साहित्य निर्मितीचे नियोजन

मंचच्या सदस्यांनी राखीपासून आपली सुरुवात केली आहे. मात्र, त्या फक्त एवढ्यावरच थांबणार नसून वर्षभर साजरे होणारे सण व उत्सवात उपयोगी साहित्य निर्मितीचे नियोजन मंचने केले आहे. राखी, रांगोळी, आकाशकंदील, बांगड्या निर्मिती, कापड शिलाई व घर सजावटीचे इतर साहित्य निर्मितीचे काम सुरू करण्याची तयारी महिलांनी सुरू केली आहे. आत्मनिर्भर महिलांनी या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला असून अर्थोत्पादनाबरोबरच महिलांचे कलाकौशल्य या अनुषंगाने विकसित होत असल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकत आहे.

Web Title: Women are becoming self-reliant in Rakhi business!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.