महिलाच बदल घडवून आणू शकतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 10:01 PM2018-01-25T22:01:06+5:302018-01-25T22:01:19+5:30

सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी पहिली शाळा काढली. त्यामुळे देशाच्या सर्वोच्च पदापासून अंतराळातही महिलांनी झेप घेतली. पुरुषांपेक्षा महिला सरस असून ग्रामीण भागातही स्वच्छतेच्या बाबतीत महिलाच खऱ्या अर्थाने बदल घडवून आणू शकतात, .....

Women can bring changes | महिलाच बदल घडवून आणू शकतात

महिलाच बदल घडवून आणू शकतात

Next
ठळक मुद्देहमीद अल्ताफ अकबर अली : गणखैरा येथे स्वच्छतामय संक्रांतीचे हळदी-कुंकू उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी पहिली शाळा काढली. त्यामुळे देशाच्या सर्वोच्च पदापासून अंतराळातही महिलांनी झेप घेतली. पुरुषांपेक्षा महिला सरस असून ग्रामीण भागातही स्वच्छतेच्या बाबतीत महिलाच खऱ्या अर्थाने बदल घडवून आणू शकतात, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष हमीद अल्ताफ अकबर अली यांनी केले.
गणखैरा येथे स्वच्छतामय संक्रांतीचे हळदीकुंकू व महिला मेळावा या उपक्रमानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
याप्रसंगी प्रामुख्याने जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, जि.प. कृषी व पशुसंवर्धन सभापती छाया दसरे, पं.स. सभापती माधुरी टेंभरे, जि.प. सदस्य विश्वजित डोंगरे, रोहिणी वरखडे, गोरेगाव पंचायत समिती सदस्य पुष्पराज जनबंधू, सरपंच धारा तुप्पट, तुमखेडाच्या सरपंच त्रिवेणी शरणागत, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी. डी. पारखे, गटविकास अधिकारी डी.बी. हरिणखेडे उपस्थित होते.
शौचालयाचे बांधकाम व त्यांचा वापर, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, बाळाच्या विष्ठेचे व्यवस्थापन, मासिक पाळी व्यवस्थापन, गरोदर माता व बालकांचे पोषण आहार आणि प्लास्टीकबंदी संदर्भात जनजागृती करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात स्वच्छतामय संक्रांतीचे हळदीकुंकू उपक्रम राबविण्यात येत आहे.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती छाया दसरे यांनी मुलगा-मुलगी यात भेदाभेद न करण्याचे मत व्यक्त करुन स्वच्छतेच्या उपक्रमांत सर्वांनीच सहभाग घेण्याचे आवाहन केले. महिलांनी एक वस्तू कमी घ्यावी, मात्र शौचालय बनवावे, असे आवाहन पं.स. सभापती माधुरी टेंभरे यांनी केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी, कुटुंबाचा केंद्रबिंदू महिला आहेत. आपले घर आपण स्वच्छ ठेवतो. त्याचप्रमाणे आपले गाव सुद्धा स्वच्छ ठेवण्याची गरज आहे. प्रत्येक व्यक्तीने आपली जबाबदारी पाळली तर संपूर्ण गाव स्वच्छ होईल. लोकांमध्ये जनजागृतीसाठीच जिल्ह्यात स्वच्छतामय संक्रांतीचे हळदीकुंकू हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमातून प्रेरणा घेवून आणि आपली गरज म्हणून शौचालयाचा वापर करा. इतरांनाही शौचालय वापरण्याची प्रेरणा देण्याचे आवाहन दयानिधी यांनी केले. पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.व्ही राठोड यांनी उपक्रमाची संपूर्ण माहिती देवून शौचालयाच्या सामाजिक गरजेवर तथा त्यातून होणाºया आर्थिक परिणामांवर मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद सदस्य विश्वजित डोंगरे यांनी समयोचित विचार व्यक्त केले.
याप्रसंगी ग्रामपंचायतीच्या वतीने अंगणवाडी केंद्राला दूरचित्रवाणी संच भेट देण्यात आले. दरम्यान स्वखर्चातून शौचालयाचे बांधकाम करुन त्याचा वापर करणाºया पूजा प्रीतम पारधी, दीपिका कापसे यांना डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
कार्यक्रमाला माजी सभापती दिलीप चौधरी, चित्रकला चौधरी, आरती चवारे, माजी उपसभापती सुरेंद्र बिसेन, बाल विकास अधिकारी वाघ, उपसरपंच लिखन पारधी, ग्रामपंचायत सदस्य, गावकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रास्ताविक अंगणवाडी पर्यवेक्षिका अनिला श्रीवास्तव यांनी मांडले. संचालन मनोज सरोजकर व प्रतिमा पारधी यांनी केले. आभार संतोष परमार यांनी मानले.
पतंजलीचा सत्कार
महिलांमध्ये जनजागृती करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात स्वच्छतामय संक्रांतीचे हळदीकुंकू हा उपक्रम राबविण्यात येत आहे. उपक्रमांतर्गत एक लाख ८० हजार महिलांपर्यंत स्वच्छतेच्या संदेशासह पोहोचण्याचा उद्देश आहे. दरम्यान महिलांना सॅनीटरी पॅड व हात धुण्यासाठी साबण वाण म्हणून देण्यात येत आहे. पतंजली समुहाने महिलांना भेट देण्यासाठी मोफत साबन उपलब्ध करुन दिले. त्याबद्दल पतंजली समुहाचे नागपूर येथील व्यवस्थापक सुनील पोगळे यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देवून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते सत्कार करण्याता आला.

Web Title: Women can bring changes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.