महिलांची हेल्पलाईन झाली ‘हेल्पलेस’

By admin | Published: November 25, 2015 05:24 AM2015-11-25T05:24:32+5:302015-11-25T05:24:32+5:30

आपण महिला-तरुणी आहात आणि आपल्यावर अचानक एखादा बाका प्रसंग ओढवला तर स्वत:चा बचाव कसा कराल?....

Women helpline becomes 'helpless' | महिलांची हेल्पलाईन झाली ‘हेल्पलेस’

महिलांची हेल्पलाईन झाली ‘हेल्पलेस’

Next

१०३ क्रमांक कुचकामी : शासनाच्या महिला सुरक्षाविषयक योजनेची लागली वाट
मनोज ताजने ल्ल गोंदिया
आपण महिला-तरुणी आहात आणि आपल्यावर अचानक एखादा बाका प्रसंग ओढवला तर स्वत:चा बचाव कसा कराल?.... ‘महिला हेल्पलाईन आहे न... १०३ क्रमांकावर डायल करेल आणि लगेच पोलिसांची मदत घेईल’... असे उत्तर तुम्ही देत असाल तर सावधान! पोलिसांच्या हेल्पलाईनवर तुम्ही विसंबून असाल आणि त्यावर फोन केल्याने तुम्हाला लगेच मदत मिळेल, असा विचार तुम्ही केला असेल तर वेळीच सावध व्हा. कारण गोंदिया जिल्ह्यात पोलिसांचा १०३ हा हेल्पलाईन क्रमांक चक्क अनेक दिवसांपासून बंद आहे. ‘हा क्रमांक अस्तित्वातच नाही’, अशी टेप ऐकण्याचा प्रसंग मदत मागणाऱ्या कोणत्याही अबलेवर येऊ शकतो.
या हेल्पलाईनची उपयोगिता तपासण्यासाठी ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये ही हेल्पलाईन संकटात सापडलेल्या महिलेची कशी फजिती करू शकते हे उघड केले. १०३ या क्रमांकावर डायल करून एखाद्या अबलेला किती तत्परतेने मदत मिळते हे तपासण्याचा प्रयत्न केला, पण मदत मिळणे तर दूर, त्या हेल्पलाईनच्या भरोशावर राहिल्यास संकटात सापडलेल्या अबलेचा आवाजसुद्धा कोणापर्यंत पोहोचू शकत नाही, याचा प्रत्यय ‘लोकमत’ला आला.जिल्ह्यातील कोणत्याही महिलेला किंवा तरुणीला घरी-दारी सुरक्षिततेचे वातावरण मिळावे आणि त्यांना आकस्मिकपणे ओढवलेल्या संकटात व असुरक्षित वातावरणात तातडीने पोलिसांची मदत उपलब्ध व्हावी यासाठी गृह विभागाकडून प्रत्येक जिल्ह्यात १०३ हा महिला हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला. एकट्या महिलेला पाहून तिची अब्रू लुटण्याचा प्रयत्न कोणी केला, किंवा चोरट्याने पर्स किंवा गळ्यातील दागिने पळविले, एखाद्या गर्दीच्या ठिकाणी असहायतेचा फायदा घेऊन छेड काढण्याचा प्रयत्न केला किंवा सासरच्या मंडळींकडून एखाद्या कारणासाठी शारीरिक अत्याचार होत असेल अशा कितीतरी प्रसंगात ती महिला, तरुणी कोणीतरी आपल्या मदतीला धावून यावे आणि ओढवलेल्या संकटातून सुखरूप वाचवावे अशी प्रार्थना करीत असते. नेमके यावेळी तिला पोलिसांनी मदत मिळावी या अपेक्षेने राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात १०३ हा हेल्पलाईन क्रमांक सुरू केला. पण गोंदिया जिल्ह्यात हा हेल्पलाईन क्रमांक कुचकामी ठरला आहे.
या क्रमांकावर तक्रार नोंदविण्यासाठी ‘लोकमत’ने शनिवारी (दि.२१) आणि मंगळवारी (दि.२४) मोबाईल आणि लँडलाईन फोनवरून अनेक वेळा प्रयत्न केले, पण ‘या नंबरची खात्री करून घ्या, हा क्रमांक अस्तित्वात नाही’ अशी टेप वाजत होती. त्यामुळे एखाद्या महिलेने या क्रमांकावर मोठ्या आशेने फोन केला तर तिच्या पदरी निराशाच पडणार हे उघड झाले. एकीकडे सरकार महिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी अशा हेल्पलाईनसारख्या सुविधा निर्माण करीत असले तरी प्रशासकीय उदासीनतेमुळे त्या सुविधांच्या चिंधड्या उडत आहेत.

‘बीएसएनएल’ म्हणते, पोलिसांचीच चूक
पोलिसांनी फोन बंद असल्याची तक्रार बीएसएनएलकडे कधी केली हे जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडे चौकशी केली असता गेल्या
१५ दिवसात पोलिसांकडून कोणतीही तक्रार आली नसल्याचे सांगण्यात आले. काही दिवसांपूर्वी १०० क्रमांक बंद असल्याची तक्रार आली होती. पण आम्ही लगेच तो क्रमांक दुरूस्त करून दिला होता. पोलीस कंट्रोल रूममध्ये १०० क्रमांकाचे ४ फोन आहेत. एकाचवेळी चारही क्रमांक बिघडू शकत नाही. फोन सुरू नाही तर त्यात पोलिसांचीच काहीतरी चूक असावी, असे बीएसएनएलच्या अधिकाऱ्याने सांगितले.

अधिकाऱ्यांची सारवासारव
हा हेल्पलाईन क्रमांक बंद असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना तरी आहे का, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर पोलीस अधीक्षक शशीकुमार मीना यांचाही मोबाईल फोन बंद होता. ते सुटीवर असल्याचे समजल्यामुळे अपर पोलीस अधीक्षक संदीप पखाले यांच्याशी संपर्क केला. त्यांनी काही दिवसांपूर्वी पोलीस कंट्रोल रूममधील १०० नंबरसह काही फोन बंद पडल्याची कल्पना असल्याचे सांगितले. १०३ हा हेल्पलाईन क्रमांकही तिथेच आहे. आम्ही त्यासंदर्भात बीएसएनएलकडे तक्रार केली असून पुढील आठवड्यात हे फोन सुरू होतील, असे उत्तर त्यांनी दिले.
हेल्पलाईनची माहितीच नाही
महिलांविषयक हेल्पलाईन क्रमांकाबद्दल किती महिलांना माहिती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता बहुतांश महिलांना त्याबद्दल माहितीच नसल्याचे त्यांनी सांगितले. काही महाविद्यालयीन युवतींनी मात्र या क्रमांकाची माहिती असल्याचे सांगितले. पण त्यावर मदत मागण्याचा प्रसंग अजूनपर्यंत आला नसल्यामुळे त्या क्रमांकाचा वापर केला नसल्याचे त्यांनी सांगितले. वास्तविक या हेल्पलाईनची पोलीस विभागाकडून प्रचार-प्रसिद्धी करून महिलांमध्ये असलेली असुरक्षिततेची भावना दूर करणे अपेक्षित आहे. मात्र हेल्पलाईनच सुरू नसल्यामुळे पोलीस आतापर्यंत त्या भानगडीत पडलेले नाही.

महिला हेल्पलाईन क्रमांकावर सहसा कोणाचे कॉल येत नाही. पण तरीही तो क्रमांक सुरू असणे गरजेचे आहे. आठ दिवसात हा क्रमांक सुरू केला जाईल. शिवाय त्याची माहिती महिलांना असावी म्हणून प्रचारही केला जाईल.
- संदीप पखाले
अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया

Web Title: Women helpline becomes 'helpless'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.