बस अपघातात महिला ठार
By admin | Published: September 23, 2016 02:01 AM2016-09-23T02:01:30+5:302016-09-23T02:01:30+5:30
येथील गोंदिया- कोहमारा मार्गावरील हिरडामाली पेट्रोल पंपाजवळ गोंदिया आगाराच्या एस.टी. बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने
स्टेअरिंग रॉड तुटला : हिरडामालीजवळ झाली अनियंत्रित
गोरेगाव : येथील गोंदिया- कोहमारा मार्गावरील हिरडामाली पेट्रोल पंपाजवळ गोंदिया आगाराच्या एस.टी. बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने बस अनियंत्रित होऊन झालेल्या अपघातात एका वृद्धेला प्राण गमवावे लागले. जसवंता राऊत (६० वर्षे) असे मृत महिलेचे नाव आहे.
प्राप्ती माहितीनुसार, गुरूवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास एचएच २०, डी ९१७५ ही बस गोंदियावरुन गोरेगावमार्गे देवरीकडे जाण्यासाठी निघाली होती. ही बस हिरडामाली पेट्रोल पंपाच्या समोर आली असताना जसवंता राऊत ही महिला बसमध्ये चढण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभी होती. मात्र त्याचवेळी बसचा स्टेअरिग रॉड तुटल्यामुळे बस अनियंत्रित झाली आणि जसवंताला या बसची धडक बसली. तिला काही वेळातच गोंदियाच्या केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान काही वेळातच तिचा मृत्यू झाला.
विशेष म्हणजे सायंकाळपर्यंत बसचालक लिलाराम हरिणखेडे (४०) यांच्यावर गुन्हा दाखल झाला नव्हता. (तालुका प्रतिनिधी)
महामंडळाच्या बसेस भंगार?
राज्य परिवहन महामंडळाच्या एम.एच. २०, डी ९१७५ या बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्यामुळे हा अपघात झाला. यात जसवंताचा हकनाक बळी गेला. या अपघातामुळे परिवहन महामंडळाच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महामंडळाच्या बसगाड्या भंगार होत आहेत की चालकाची चूक होती, याचा तपास होणे गरजेचे आहे. जर बसगाड्या भंगार होण्याच्या मार्गावर असतील तर वेळीच त्या दुरूस्त करणे गरजेचे आहे. अन्यथा पुढेही दुसऱ्या एखाद्या बसला अशाच पद्धतीने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.