महिलांना कायद्याची जाणीव असणे आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 09:27 PM2018-02-25T21:27:05+5:302018-02-25T21:27:05+5:30
कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण मिळावे म्हणून सन २००५ मध्ये कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा अंमलात आला.
ऑनलाईन लोकमत
सालेकसा : कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण मिळावे म्हणून सन २००५ मध्ये कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा अंमलात आला. परंतु कायद्याची जाणीव नसल्यामुळे आजही अनेक महिला कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडत आहेत. अशात महिलांना कायद्याची जाणीव असणे आवश्यक आहे. यासाठी समाजातील विविध जबाबदार घटकांनी यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन पोलीस निरीक्षक मोहन खांदारे यांनी केले.
महिला व बाल विकास विभागाच्या संरक्षण अधिकारी कार्यालयाच्यावतीने येथील पोलीस ठाण्यातील सभागृहात आयोजीत कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा-२००५ या विषयावरील जनजागृती कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष विरेंद्र उईके होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी पौनीकर, तालुका संरक्षण अधिकारी रविकुमार अंबुले, नगर पंचायतचे बांधकाम सभापती उमेदलाल जैतकर, जिल्हा संरक्षण अधिकारी सोयाम, परीविक्षा अधिकारी रामटेके, महिला तक्रार निवारण कक्ष समुपदेशक रजनी रामटेके, मुलींच्या वस्तीगृहाचे गृहपाल काळे, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे गोबाडे, लोकमत सखी मंच संयोजिका किरण मोरे, इतर तालुक्यातील संरक्षण अधिकारी कुंभरे, श्यामसुंदर, भालाधरे, बारेवार व इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करुन पुष्पांजली वाहण्यात आली व कार्यक्रमाचे विधीवत उद्घाटन करण्यात आले. प्रास्तावीकातून तालुका संरक्षण अधिकारी रविकुमार अंबुले यांनी सदर कार्यक्रमाची महिलांना असणारी गरज, या कायद्यामधून मिळणाºया सेवा व मदत या विषयी माहिती देत या कायद्याचा उपयोग करावा असे मत मांडले. नगराध्यक्ष उईके यांनी, सर्वांनी आपल्या कुटुंबातील समस्या समोपचाराने सोडवाव्यात. वेळप्रसंगी कायद्याची मदत घ्यावी आणि अत्याचाराचा प्रबळ विरोध करायला पाहिजे असे सांगीतले. संचालन पुनेश नाकाडे यांनी केले. आभार चंदू उके यांनी मानले.