‘वाण’ खरेदीसाठी महिलांची धाव
By admin | Published: January 16, 2017 12:19 AM2017-01-16T00:19:25+5:302017-01-16T00:19:25+5:30
सौभाग्याचा सण म्हणून साजरा केल्या जात असलेल्या मकर संक्रांतीत तीळ-गुळाचे मान आहे.
हळदीकुंकूचे आयोजन जोमात : बाजारात वाढली महिलांची गर्दी
गोंदिया : सौभाग्याचा सण म्हणून साजरा केल्या जात असलेल्या मकर संक्रांतीत तीळ-गुळाचे मान आहे. तर सोबतच सौभाग्यवती हळदीकुंकूचे आयोजन करून त्यात ‘वाण’ देतात. वाणात एखादी वस्तू जरी वाटली जात असली तरी ती सौभाग्याची निशानी असल्याने सध्या ‘वाण’ खरेदीसाठी महिला धाव घेत आहेत. यामुळेच बाजारात महिलांची गर्दी दिसून येत आहे.
संक्रांत म्हटली की तीळ-गुळाचे लाडू डोळ््यासमोर येतात. मात्र संक्रांतीचा हा सण फक्त तीळ-गुळाच्या लाडू पुरताच मर्यादीत नसून महिलांच्या सौभाग्याचा हा पवित्र सण आहे. त्यामुळेच सौभाग्यवती महिला संक्रांतीत हळदीकुंकूचे आयोजन करून सौभाग्यवतींना हळदीकुंकू व त्यात ‘वाण’ देतात. ‘वाण’ म्हणजे ही एखादी वस्तू असते. मात्र सौभाग्याचे प्रतीक म्हणून ते दिले जात असल्याने त्याचे मुल्य काही औरच असते. यामुळेच मकर संक्रांतीत वाणालाही तेवढेच महत्व आहे.
बाजारात सध्या ‘वाण’ खरेदीला जोम आला आहे. आपल्या पसंतीची वस्तू वाणात द्यायला खरेदी करण्यासाठी महिला बाजाराची धाव घेत आहे. तर संक्रांतीचे निमित्त साधून दुकानदारही वाणासाठी विविध प्रकारच्या वस्तू मागवून आपल्या दुकानी सज्ज करून आहेत. ‘वाण’ देताना आपल्या मर्जीचे असावे यासाठी महिला स्वत: आपल्या पसंतीची वस्तू खरेदी करतात. यामुळेच बाजारात महिलांची गर्दी जास्त दिसून येत आहे.
आता संक्रांत झाली असून काही ठराविक दिवसांत हळदीकुंकूचे आयोजन करून महिला ‘वाण’ वाटतात. त्यामुळे महिला ‘वाण’ खरेदीसाठी बाजारात येत असून त्यानंतर आपल्या सवडीने हळदीकुंकू ठेवतात. (शहर प्रतिनिधी)
महिलांच्या हक्काचा काळ
एरवी महिला आपल्या घरातील कामातच व्यस्त असतात व त्यांची ओळखीच्या महिला व मैत्रीणींसोबत भेट होत नाही. घरातील कामामुळे त्यांना घराबाहेर पडणे कठीण असते. किंवा काम करणाऱ्या महिलांना आपल्या कामातूनच वेळ काढून बाहेर जाण्याची सवड नसते. मात्र संक्रांतीचा हा काळ म्हणजे महिलांच्या हक्काचा काळच असतो. संक्रांतीनिमित्त आयोजीत हळदीकुंकूच्या माध्यमातून या महिलांची आपसात भेट होते. परिणामी प्रत्येकच महिला कसा तरी वेळ काढून दररोज हळदीकुंकूला हजेरी लावते. सायंकाळ होताच महिलांचे ग्रुप हळदीकुंकूसाठी जाताना दिसतात व पुरूष घरी असतात. म्हणूनच संक्रांत म्हणजे महिलांच्या बाहेर फिरण्याचा हक्काचा काळ म्हटला जातो.