महिला मूर्तिकार घडवितात बाप्पांची मूर्ती ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:34 AM2021-09-08T04:34:54+5:302021-09-08T04:34:54+5:30
नरेंद्र कावळे आमगाव : शहरात मूर्तिकार ताटी म्हणून प्रसिद्ध असलेले ताटी कुटुंबीय गणेशमूर्ती बनविण्यात सध्या व्यस्त आहे. आपल्या कलेतून ...
नरेंद्र कावळे
आमगाव : शहरात मूर्तिकार ताटी म्हणून प्रसिद्ध असलेले ताटी कुटुंबीय गणेशमूर्ती बनविण्यात सध्या व्यस्त आहे. आपल्या कलेतून ते पर्यावरणपूरक व शास्त्रोक्त पद्धतीने मूर्ती बनवत असून कलेत त्यांचा हातखंडा आहे. कुटुंबातील महिला सदस्यसुद्धा आपल्या कलाकुसरीतून आकर्षक गणेशमूर्ती साकारत आहेत.
गणेशोत्सव काही दिवसांवर आला असून सर्वांना सुंदर व आकर्षक मूर्ती हव्या असतात. लाडका बाप्पा आपल्या मनासारखा असायला हवा, त्याची सुंदर आकर्षक ठेव, आकर्षक रंग, बैठक असे असेल तर भक्तांना अतिशय आनंद मिळतो. हीच बाब ओळखत शहरातील ताटी कुटुंबातील शारदा ताटी (६५) व त्यांची त्यांची सून सुनीता माधव ताटी, यशोदा राजू ताटी व पुतणी उषा ताटी या स्वतः बाप्पाच्या लहान व माेठ्या मूर्ती बनवितात. ताटी कुटुंब कित्येक वर्षांपासून ही परंपरा जोपासत आहे. शारदाबाई यांचे पती हिरामण ताटी हे मूर्तीकार ताटी म्हणून प्रसिद्ध आहेत. आज ते ७५ वर्षांचे असूनसुद्धा स्वतः रंगरंगोटी व बाप्पांची कलाकुसर करतात.
सर्वात महत्वाचे म्हणजे डोळ्यांची कलाकुसर अतिशय कलेचे काम आहे व ते स्वतः शारदाबाई करतात. परंतु आता वयानुसार त्यांनी मुलांना या कामात पारंगत केले आहे. मूर्तीकला ही या कुटुंबीयांची अनेक वर्षांची परंपरा असून परिस्थिती व भक्तांच्या मागणीनुसार गणेशमूर्तीत बदल केले जातात. वर्षभर आम्ही मूर्ती बनवत असतो, असेही ताटी कुटुंबीय सांगतात.
---------------------------------
पर्यावरणपूरक मूर्तीला प्राधान्य
यापूर्वी काही वर्षे पीओपीच्या मूर्ती बनविल्या मात्र या मूर्ती विसर्जनानंतर पूर्ण विरघळत नाही. त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त मातीच्या मूर्ती बनवतो. पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती करत आहोत आणि आतापर्यंत छोट्या-मोठ्या हजारो मूर्ती बनविल्याचे ताटी कुटुंबीयांनी सांगितले. त्यांच्या कलेची ओळख शहराच्या बाहेरही झाली आहे. कृष्णजन्माष्टमी, गणेशोत्सव, दुर्गाउत्सव, शारदा उत्सव असो वा अन्य कुठल्याही प्रकारची मूर्ती आजूबाजूला ताटी कुटुंबीयांकडूनच विकत घेतली जाते.
-----------------------
मूर्तीकारांच्या कलेचाही गौरव व्हावा
सर्वांत लोकप्रिय उत्सव असलेला गणेशोत्सव अवघ्या २ दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशमूर्तींना साकारण्यासाठी मूर्तिकारांचे हात वेगाने फिरत आहेत तर दुसरीकडे या व्यवसायाचे स्वरूप बदलले असले तरी मूर्ती तयार करण्याच्या कामात आजही मूर्तीकारांचेच प्राबल्य आहे. मात्र, मूर्तीकारांची उपेक्षा होत आहे. आज विविध क्षेत्रांतील मान्यवरांना सरकार पुरस्कार देते तसाच एखादा पुरस्कार मूर्तीकारांना देऊन त्यांच्या कलेचा गौरव केला पाहिजे, अशी अपेक्षा ताटी यांनी व्यक्त केली.
--------------------------
कोट
सासरी आल्यानंतर मी मूर्ती बनवायला शिकले. साक्षात बाप्पा बनविण्याचे भाग्य मिळाले. मूर्तीकला ही सगळ्यांना अवगत नसते. त्यात लाडका बाप्पा बनविणे म्हणजे एक वेगळाच आनंद. प्रत्येक मूर्ती बनविताना आम्ही त्या मनापासून बनवितो. त्यामुळे मूर्तीत जिवंतपणा येतो.
- शारदा ताटी, महिला मूर्तीकार.