गोंदियात साकारणार महिला प्रशिक्षण केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 10:31 PM2018-03-26T22:31:47+5:302018-03-26T22:31:47+5:30
काँग्रेस पक्षाने गोंदिया जिल्हा परिषदेसारख्या महत्वपूर्ण स्वराज्य संस्थेत रजनी नागपुरे, उषा मेंढे व आता सीमा मडावी यांच्या रूपाने महिला नेतृत्वाला समोर आणण्याचे काम केले आहे.
आॅनलाईन लोकमत
गोंदिया : काँग्रेस पक्षाने गोंदिया जिल्हा परिषदेसारख्या महत्वपूर्ण स्वराज्य संस्थेत रजनी नागपुरे, उषा मेंढे व आता सीमा मडावी यांच्या रूपाने महिला नेतृत्वाला समोर आणण्याचे काम केले आहे. यातून काँग्रेस पक्ष महिला सशक्तीकरणासाठी किती गंभीर आहे, याची प्रचिती येते. जिल्ह्यात महिलांशी संबंधित महिला आर्थिक विकास महामंडळासाठी भव्य प्रशिक्षण केंद्राचे बांधकाम जयस्तंभ चौकातील वन विभागाच्या कार्यालयाच्या ठिकाणी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी येथे सांगितले.
जि.प. महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय महिला मेळावा घेण्यात आला. मेळाव्याच्या उद्घाटकीय भाषणातून ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी पालकमंत्री राजकुमार बडोले होते. अतिथी म्हणून जि.प. अध्यक्ष सीमा मडावी, माजी जि.प. अध्यक्ष उषा मेंढे, महिला व बालकल्याण सभापती लता दोनोडे, पं.स. सभापती माधुरी हरिणखेडे, जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. राजा दयानिधी उपस्थित होते.
आ. अग्रवाल म्हणाले, भारताच्या इतिहासात अनेक महिलांनी देशाचे नाव मोठे केले. स्वतंत्र भारतात काँग्रेस सरकारने महिलांच्या उत्थानासाठी निरंतर नवनवीन योजनांना लागू केले. त्यामुळे महिलांनी घराबाहेर निघून शासकीय व राजकीय क्षेत्रात आपली पकड मजबूत करणे सुरू केले. जुन्या संस्कृतीमुळे महिला घराबाहेर निघू शकत नव्हत्या. मात्र काँग्रेस सरकारच्या धोरणांमुळे आज राष्टÑपती पदापर्यंत महिला पोहोचली. देशाची प्रथम महिला पंतप्रधान सुध्दा काँग्रेस सरकारनेच दिले. भारतरत्न इंदिरा गांधी सारख्या लोहमहिलेचे नेतृत्व भारताला लाभले. चारवेळा भारत देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान पदाला नवीन ओळख दिली. आज सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक व क्रीडा यासारख्या क्षेत्रात महिलांचा वर्चस्व वाढला आहे, यामागे मागील ७० वर्षात काँग्रेस सरकारच्या धोरणांचे मोठे योगदान आहे, असे ते म्हणाले.
आपल्या मार्गदर्शनात पालकमंत्री बडोले म्हणाले, महाराष्टÑ शासन संपूर्ण राज्यात महिलांच्या उत्थानासाठी कार्य करीत आहे. गोंदिया जिल्ह्यात आमदार अग्रवाल यांचा सतत पाठपुरावा व तीव्र ईच्छाशक्तीमुळे असे रचनात्मक आयोजन सुगमतेने होत आहेत, असे सांगितले.
जि.प. अध्यक्ष सीमा मडावी यांनी महिला सक्षमीकरण व महिला उत्थान यावर मार्गदर्शन केले. महिला व बाल कल्याण सभापती लता दोनोडे यांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून आत्मनिर्भर होत असल्याचे सांगितले. तसेच पं.स. सभापती माधुरी हरिणखेडे यांनी, महिलांना स्वयंरोजगार देवून आत्मनिर्भर बनविण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक शिबिरांचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.