महिला परत वळल्या चुलीकडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:55 AM2021-03-04T04:55:30+5:302021-03-04T04:55:30+5:30
केशोरी : चुलीवर स्वयंपाक केल्यामुळे निघणाऱ्या धुराने महिलांमध्ये डोळ्यांचे आजार बळावले होते. त्याचबरोबर चूल पेटविण्यासाठी लागणाऱ्या लाकडांमुळे जंगल तोडीचे ...
केशोरी : चुलीवर स्वयंपाक केल्यामुळे निघणाऱ्या धुराने महिलांमध्ये डोळ्यांचे आजार बळावले होते. त्याचबरोबर चूल पेटविण्यासाठी लागणाऱ्या लाकडांमुळे जंगल तोडीचे प्रमाण वाढले होते. महिलांचे आजार आणि वृक्षतोड थांबविण्यासाठी केंद्र शासनाने उज्वला गॅस योजना कार्यान्वित करून या परिसरातील खेड्या-पाड्यात मोफत गॅस सिलिंडर वितरित करून योजनेचा गवगवा केला. परंतु आता गॅसच्या वाढत्या किमतीमुळे महिला कंटाळल्या असून, त्या परत सरपणासाठी लागणाऱ्या काड्या जंगलातून तोडून चुली पेटविण्याकडे वळल्याचे दिसून येत आहे.
वृक्षतोडीवर आळा बसावा आणि महिलांना चुलीच्या धुरामुळे उद्भवाऱ्या आजारांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून केंद्र शासनाने उज्वला गॅस योजना कार्यान्वित केली. याअंतर्गत या भागातील खेड्या-पाड्यात मोफत गॅस सिलिंडरचे मोठ्या प्रमाणात वितरण करून महिलांना दिलासा दिला होता. परंतु अलीकडे वेळोवेळी गॅस सिलिंडरच्या दरवाढीमुळे गरीब कुटुंबातील महिला धास्तावल्या आहेत. सिलिंडरची किंमत सध्या ८३९ रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे उज्वला योजेनेच तीनतेरा वाजले असून, आदिवासी महिलांकडे गॅस सिलिंडर उपलब्ध असूनही त्यांनी जंगलातील सरपण जमा करून चुली पेटवायला सुरुवात केली आहे. चुलीतून निघणाऱ्या धुरामुळे महिलांना डोळ्यांचे विविध आजार होण्याची शक्यता निर्माण झाली असून, त्याचबरोबर वृक्षतोडीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
हा भाग जंगलवेष्ठीत असून, उज्वला गॅस योजनेंतर्गत या भागातील गावागावांत मोफत गॅस सिलिंडरचे वाटप करण्यात आले आहे. परंतु वाढलेल्या गॅसच्या किमतीमुळे गरीब कुटुबांना गॅस पेटविणे परवडणारे नाही. रोज मजुरी करणाऱ्या कुटुंबांन ते अवघड आहे. यामुळे जंगल तोडीचे प्रमाण वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या किमतीमुळे महिला वर्गातून शासनाप्रती संताप व्यक्त केला जात आहे.