लेकरांना घरी ठेवून रात्री उशीरापर्यंत ‘वुमेन वॉरियर्स’ऑन ड्युटी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 11:38 AM2021-06-03T11:38:49+5:302021-06-03T11:40:28+5:30
Gondia News मुलांच्या हट्टाला बाजूला सारून पोलीस खात्यातील ‘वुमेन वॉरियर्स’ लेकरांना घरी ठेवून रात्री उशिरापर्यंत आपले कर्तव्य बजावत असतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महिलांना पुरुषांपेक्षा अधिक वेळ कुटुंबाला द्यावाच लागतो. आई, पत्नी म्हणून येणारी कर्तव्ये बजावत पोलीस महिलांची ड्युटी करताना रात्री घरी परतण्याची वेळ निश्चित नसते. बऱ्याचदा रात्रपाळीतही काम करावे लागते. अशावेळी मुलांना आईची उणीव जाणवते. तरीही मुलांच्या हट्टाला बाजूला सारून पोलीस खात्यातील ‘वुमेन वॉरियर्स’ लेकरांना घरी ठेवून रात्री उशिरापर्यंत आपले कर्तव्य बजावत असतात.
कुटुंबाची जबाबदारी सांभाळतानाही नागरिकांची सेवा करताना दिसतात. कोरोनाच्या संकटात आरोग्य यंत्रणेसोबतच पोलीसही फ्रंटलाईन वॉरियर म्हणून लढत आहेत. यात महिला पोलिसांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची आहे. पोलीस ठाण्यातील इतर कामकाज सांभाळण्यापासून प्रतिबंधित क्षेत्रात शांतता राखण्यापर्यंत महिला पोलीस जबाबदारीने कर्तव्य बजावित आहेत. महिलांच्या संदर्भातील गुन्ह्यांची उकल करण्यात महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांची महत्त्वाची भूमिका असते. पुरुष कर्मचाऱ्यांइतकाच कामाचा ताण महिला पोलिसांवर देखील असतो. अशा स्थितीत अनेक महिला पोलीस कर्मचाऱ्यांची मुले पाच ते सात वर्षे वयोगटातील आहेत.
आईने घरीच थांबावे, असा या चिमुकल्यांचा आग्रह असतो. आईच्या अवतीभोवतीच खेळत राहावे, असे त्यांना वाटते. कर्तव्यावर असणाऱ्या महिला पोलिसांची देखील आपल्या मुलांसाठी घालमेल होते. मायेचा हात फिरवून मुलांची समजूत घालावी लागते. त्याचसोबत या कोवळ्या वयात त्यांना परिस्थितीची जाणीव देखील करून द्यावी लागते. त्यानंतर कोरोना आणि पोलीस प्रशासनावरील ताण ही बाब एकदा मुलांच्या लक्षात आली की, आपण या परिस्थितीमध्ये समाजासाठी काहीतरी वेगळे काम करीत योगदान देत असल्याचा अभिमान वाटत असल्याच्या प्रतिक्रिया गोंदिया जिल्ह्यातील पोलिस महिलांनी दिल्या आहेत.
पोलीस अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळताना वेळ कोणती ही पहावी लागत नाही. ड्युटीवर असल्यामुळे मुलांचा सांभाळ करताना कसरत करावी लागते. आई घरी लवकर यावी हा मुलांचा आग्रह असतो. पण नोकरी करताना मुलांकडे जरा दुर्लक्षच होते. पण ते कसरत करून सांभाळून घ्यावे लागते.
- प्राजक्ता पवार, पोलीस उपनिरीक्षक तिरोडा.
ड्युटीवर असताना मुलांना वेळ देणे शक्य होत नाही. काही काळ मुलांचा सांभाळ पती करतात. सासूबाईपण मुलांना सांभाळतात. मुलांना सतत आठवण आल्याने ते फोन करतात किंवा आपल्याला विचारावे लागते काय सुरू आहे. नोकरी करीत असतांनाही मुलांना जेवण केले का? काळजी घ्या, भांडण करू नका. त्यामुळे चिंता कमी वाटते.
- अरूणा पांडुरंग भांडारकर, महिला पोलीस
महिला पोलीस अधिकारी म्हणून काम करताना पत्नी, आई या जबाबदाऱ्यादेखील पार पाडाव्याच लागतात. इतर महिलांप्रमाणे चूल अन् मूल हे विश्व आमचे नाही. मुलांकडे थोडेफार दुर्लक्ष होते. देशसेवा करण्याचा अभिमान देखील आम्हांला आहे. आमच्या नोकरीची जाणीवही घरच्यांना असल्याने घरच्यांकडून चांगला प्रतिसाद मिळते.
- राधा लाटे पोलीस उपनिरीक्षक गोंदिया.
मुलांची काळजी मोबाईलवरूनच
२४ तास सात दिवस ही पाेलिसांची ड्युटी असल्यामुळे आपल्या कुटुंबाची काळजी मोबाईलवरून घ्यावी लागते. वेळ मिळेल तेव्हा घरच्यांना फाेन करून घरच्या परिस्थितीची माहिती घेणे, सल्ला देणे, सूचना देणे व घरातील वातावरण आपण नसले तरी खेळमेळीच्या वातावरणात राहील याची काळजी मोबाईलवरून महिला पोलीस घेत असतात.
मुलांच्या प्रतिक्रिया...
आई पोलीस म्हणून काम करते. वडीलही आपल्या दुसऱ्या कामात व्यस्त असतात. आईला साप्ताहिक सुटी असेल त्याचदिवशी पूर्ण दिवस आई आम्हांला देते. इतर वेळी नेहमी धावपळ असल्याचे दिसून येते. शाळा बंद असल्यामुळे आम्हांला जास्तच आठवण येते.
- रितिका आशिष बहेकार
कोरोनाच्या काळात आईच्या कामाची वेळ वाढली आहे. त्यामुळे ती लवकर घरी यावी, असे नेहमी वाटते. आई ड्युटीवर जाण्यापूर्वी सगळ्या गोष्टी सांगून जाते. आठवण आल्यानंतर फोन करून तिच्याशी बोलतो, कधीतरी ती घरी लवकर आल्यावर आम्हांला खूप आनंद होतो.
-एकांश बहेकार
आई पोलीस म्हणून काम करते. आईला साप्ताहिक सुटी असेल त्याचदिवशी पूर्ण दिवस आई आम्हांला देते. लगेच पोलीस ठाण्यातून फोन आला की हातातील काम बाजूला सारून धावत-पळत ती पोलीस ठाण्यात जाते. देशसेवेचे व्रत बाळगल्यामुळे आम्हीही समजून घेतो.
- योगेश विजय फुंडे
.............................