दारूबंदीसाठी महिलांचा ‘एल्गार’
By admin | Published: May 29, 2017 01:55 AM2017-05-29T01:55:54+5:302017-05-29T01:55:54+5:30
ग्रामपंचायत कावराबांध अंतर्गत सर्व वैध व अवैध दारूची दुकाने तसेच बियरबारची दुकाने कायमची बंद करण्यात यावी,
अधिकाऱ्यांना दिले निवेदन : दारू दुकान कायमचे हटविण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : ग्रामपंचायत कावराबांध अंतर्गत सर्व वैध व अवैध दारूची दुकाने तसेच बियरबारची दुकाने कायमची बंद करण्यात यावी, यासाठी गावातील महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक दिली. दारुबंदी विषयक परिस्थिती जाणून घेण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमक्ष जोरदार घोषणा देत आपला आवाज बुलंद केला. दारूबंदी करण्याचे निवेदन दिले.
१ एप्रिलपासून महामार्गालगत सर्व दारुची दुकाने व बियरबार बंद करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्या अनुषंगाने कुणबीटोला येथील देशी दारु दुकान आणि बियरबार बंद करण्यात आली. ती दुकान पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे बघून गावातील महिला-पुरुषांनी गोंदियातील संबंधीत अधिकाऱ्याना निवेदन देऊन सदर दुकाने पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले. दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क अधिकारी देवरी यांनाही निवेदन दिले. गावकऱ्यांच्या निवेदनावर विचार करीत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक आणि त्यांचे सहकाऱ्यांना कावराबांध ग्रामपंचायतला थेथे महिलांनी पाचारण केले होते. कुणबीटोला परिसरातील शेकडो महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक देत एल्गार पुकारला. निरीक्षकासमोर उभे होवून आपआपल्या घरच्या व्यथा मांडल्या. दारूमुळे पती पिडित महिलांनी व्यथा सांगितली.
यावेळी निरीक्षकांनी महिलांच्या मांडलेल्या व्यथा नमूद केल्या. यावेळी ग्रामपंचायत कावराबांधच्या सरपंच मंजुलता बनोठे, पंचायत समिती सदस्या प्रमिला दसरिया, ग्रामपंचायत सदस्या तोमेश्वरी मच्छिरके, प्रमिला नागपुरे, डिलन दसरीया यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या. पोलीस पाटील व गावातील अनेक नागरिक उपस्थित होते. ग्रामपंचायत कावराबांध अंतर्गत विविध महिला बचत गटाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सदस्य उपस्थित होते. यावेळी सर्व महिलांनी गावातील वैध, अवैध दारूची दुकाने बंद करण्यात यावी तसेच चोरीने अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली.
निवेदनाला केराची टोपली?
दारूबंदीची मागणी करणाऱ्या महिलांची मते जाणून घेतल्यानंतर महिलांनी दारू दुकाने बंद करण्याचे निवेदन दुय्यम निरीक्षकांना दिले ते त्यांनी स्वीकार केले. नंतर काही पदाधिकारी आणि दारूबंदीसाठी पुढाकार घेणाऱ्या लोकांसोबत बोलले की निवेदनावर आम्ही निर्णय घेऊ शकत नाही. हे निवेदन आम्ही केराच्या टोपलीत टाकणार, या त्यांच्या भाषेमुळे अनेकांना संशय आला.