दारू दुकानाविरोधात महिलांचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 12:16 AM2018-04-08T00:16:02+5:302018-04-08T00:16:02+5:30
वर्षभरापासून बंद असलेले दारु दुकान पुन्हा सुरू केले जात असल्याची माहिती खमारी येथील महिलांना कळताच त्यांनी शनिवारी (दि.७) दुपारी २ वाजताच्या सुमारास या विरोधात एल्गार पुकारला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : वर्षभरापासून बंद असलेले दारु दुकान पुन्हा सुरू केले जात असल्याची माहिती खमारी येथील महिलांना कळताच त्यांनी शनिवारी (दि.७) दुपारी २ वाजताच्या सुमारास या विरोधात एल्गार पुकारला. तसेच दारुच्या पेट्या रस्त्यावर फेकून संताप व्यक्त केला. गावातील महिला आक्रमक झाल्याने खमारी येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
प्राप्त माहितीनुसार गोंदिया तालुक्यातील खमारी येथील बस स्थानकाजवळ एक देशी दारू दुकान आहे. हे दारू दुकान बंद करण्यासाठी २५ एप्रिल २०१७ ला खमारी येथील ग्रामसभेने ठराव पारीत करून हे देशी दारू दुकान बंद करण्यात आले. हा ठराव घेतला त्यावेळी सरपंचपदी विमला मोहन तावाडे या होत्या. सर्व गावकरी महिलांनी या दारू दुकानाला विरोध दर्शविला होता. हे दारू दुकान वर्षभरापासून बंद होते. विमला तावाडे सरपंच असल्यामुळे त्यांनी या दारू दुकानाला सुरूच होऊ दिले नाही. त्यानंतर दारू दुकान मालकाने शनिवारी एका वाहनात दारूच्या पेट्या आणल्या.
येथील दारु दुकान पुन्हा सुरू केले जात असल्याची माहिती गावातील महिलांना कळताच २०० पेक्षा अधिक संख्येत महिलांनी एकत्र येवून या दारू दुकानाकडे धाव घेतली. आणलेली दारू परत ने असे दुकानदाराला महिलांनी सांगितले. परंतु महिलांचे दुकानदाराने न ऐकल्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी दारूच्या बॉटल फोडल्या. एक बॉटल दुसऱ्या बॉटलवर आदळल्याने दारूने पेट घेतला. मात्र पोलिसांनी वेळीच खबरदारी घेतल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान या सर्व प्रकारामुळे खमारी येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
विशेष म्हणजे या देशी दारू दुकानाला विरोध करणाºया सरपंच विमला मोहन तावाडे यांच्यावर २७ मार्च २०१८ ला अविश्वास आणण्यात आला.
त्यांच्यावर अविश्वास आल्यानंतर आता लगेच दारू दुकान सुरू करण्याचा प्रयत्न झाल्याने गावात विविध चर्चेला पेव फुटले आहे. काहीही झाले तरी गावात दारुचे दुकान सुरू होवू देणार नाही असा पावित्रा खमारी येथील महिलांनी घेतला आहे.
गावातील तरूण व्यसनाधिनतेकडे वळू नये, यासाठी ग्रामसभेने हे दारू दुकान बंद करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेतला. लोकांच्या भावनांचा आदर करीत मी सरपंचपदी असताना या दारू दुकानाला सुरूच होऊ दिले नाही. त्यामुळेच माझ्यावर अविश्वास आणण्यात आला. परंतु मी पदासाठी काम करीत नाही जनसामान्यांच्या हितासाठी माझे काम आहे. मी गावातील महिलांसोबत आहे.
- विमला तावाडे,
माजी सरपंच खमारी.