महिला कुटुंबाच्या केंद्रबिंदू ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:18 AM2021-07-23T04:18:42+5:302021-07-23T04:18:42+5:30
गोंदिया : महिला या कुटुंबाचा केंद्रबिंदू आहेत. मात्र त्यांच्याच प्रकृतीकडे नेहमीच दुर्लक्ष होते. ह बाब गंभीर असून, यासाठीच आता ...
गोंदिया : महिला या कुटुंबाचा केंद्रबिंदू आहेत. मात्र त्यांच्याच प्रकृतीकडे नेहमीच दुर्लक्ष होते. ह बाब गंभीर असून, यासाठीच आता विशेष करून महिलांचे मोफत सर्वरोग स्क्रिनिंग व मोफत उपचार महिला रुग्णालयातून केले जातील, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे यांनी सांगितले.
राष्ट्रीय माता बाल संगोपन कार्यक्रमाअंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्यावतीने गुरुवारी (दि.२२) बाई गंगाबाई महिला व बाल रुग्णालयात आयोजित चाळिशी पार महिलांची पॅप्स स्मेअर तपासणी व गर्भवतींच्या मोफत तपासणी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नरेशचंद्र तिरपुडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरिष मोहबे, महिला आरोग्य अभियानच्या संयोजिका डॉ. सुवर्णा हुबेकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. गरीमा बग्गा, प्रा. सावंत, प्रा. जुही पुरी, गंगाबाई रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सागर सोनारे, सामाजिक कार्यकर्ता सुनील केलनका, संजय कुलकर्णी, गोल्डी गावंडे, पुरुषोत्तम ठाकरे, पलाश लालवानी, अभय अग्रवाल प्रामुख्याने उपस्थित होते.
भगवान धन्वंतरींच्या छायाचित्रापुढे दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन डॉ. कापसे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. तिरपुडे यांनी, कोविडमुळे मागील दीड वर्षापासून चाळिशी पार महिलांच्या गर्भपिशवीच्या शस्त्रक्रिया थांबलेला होत्या; पण आता बीजीडब्ल्यूमध्ये निष्णात स्त्रीरोग सर्जनच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनाअंतर्गत गर्भपिशवी ऑपरेशन सुरू झाले असून, त्याचा लाभ घ्यावा, असे सांगितले. डॉ. मोहबे यांनी, बऱ्याच दिवसांपासून नॉनकोविड रुग्णांच्या आरोग्य तपासणीला अडथळे येत होते. परंतु आता या कॅम्पच्या माध्यमातून सर्व वयोगटातील महिलांनी रक्तदाब, शुगर, थायराॅईड आदी सर्व मोफत तपासण्या करून उपचार करून घ्याव्या, असे सांगितले.
-----------------------------------------
४३२ महिलांची आरोग्य तपासणी
या शिबिरात डॉ. बग्गा, डॉ. हुबेकर, डॉ. सावंत, डॉ. सोनारे, डॉ. पुरी यांच्या नेतृत्वात ४३२ महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच त्यांना गोळ्या, औषधे डॉ. तिरपुडे यांच्या सौजन्याने देण्यात आली. याप्रसंगी डॉ. तिरपुडे यांनी, गंगाबाई रुग्णालयातून पुरविण्यात येणाऱ्या सुविधांचा महिलांनी लाभ घेऊन निरोगी राहावे, असे आवाहन केले.