महिलांची पायपीट : नळयोजना कुचकामी
By admin | Published: April 20, 2016 02:03 AM2016-04-20T02:03:18+5:302016-04-20T02:03:18+5:30
सडक-अर्जुनी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शेंडा येथे पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे.
शेंडा-कोयलारी : सडक-अर्जुनी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शेंडा येथे पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. यासाठी संबंधित विभागाने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करून पुरेशा पाण्याचा पुरवठा करावा, अशी जनतेची मागणी आहे.
शेंडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मसरामटोला येथे चार, आपकारीटोला येथे चार व शेंडा येथे १२ बोअरवेल्स आहेत. त्याचप्रमाणे एक नळयोजना, गावात १७ वैयक्तिक बोअरवेल्स व विहिरीत केलेल्या सहा बोअरवेल्स आहेत. तरीही पाण्याची भिषण टंचाई जाणवत आहे.
या गावात जलस्वराज्य योजनेंतर्गत २३ लाख रुपये खर्च करून सन २००४-०५ मध्ये नळयोजना अस्तित्वात आली. परंतु नियोजनशुन्य कामामुळे आपकारीटोला, मसरामटोला तर सोडाच परंतु शेंड्यातील निम्म्या गावालासुध्दा त्याद्वारे पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे ही योजना कुचकामी ठरली आहे.
मागील वर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने तलावात पाणी साचले नाही. विहिरी कोरड्या पडल्या. पाण्याचे स्त्रोत खाली गेल्याने घरगुती बोअरवेलचे पाणी बाहेर निघत नाही. गावातील काही बोअरवेल्सचे पाणी पिण्यायोग्य नाही. त्यामुळे गृहिणींना पाण्यासाठी भटकावे लागत आहे.
एका महिलेने तर पाण्याअभावी आपण दोनच दिवस कपडे धूत असल्याचे सदर प्रतिनिधीकडे बोलून दाखविले. यावरून पाणी समस्या कशी बिकट असेल याची कल्पना येते.
उन्हाळा संपायला अजून दोन महिने उरले आहेत. तोपर्यंत आपण पाणी कुठून आणायचे, असा प्रश्न गृहिणींसमोर उभा ठाकला आहे. विद्युत दाबाची समस्या याहूनही बिकट आहे. विद्युत दाब पुरेसा नसल्याने पाण्याच्या मोटारी सुरुच होत नाही. त्यामुळे बोअलवेल्स असूनसुध्दा त्याचा फायदा होत नाही. या प्रकाराने नागरिक त्रस्त झाले असून संबंधित प्रशासनावर रोष व्यक्त करीत आहेत.
प्रशासनाने यावर उपाययोजना करून जनतेला पुरेशा पाण्याची सोय करावी अन्यथा महिला पंचायत समितीवर घाघर मोर्चा काढणार, असा इशारा महिलांनी दिला आहे. (वार्ताहर)