काष्ठ कलेतून मिळतोय जिवनाला आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 10:38 PM2019-08-27T22:38:43+5:302019-08-27T22:39:39+5:30
आपल्या सफाईदार कोरीव कामातून सागावान लाकडापासून नंदी बैल तयार केले ते नंदी बैल हातोहात विकले जात असून त्यांना यातून ५० हजार रुपयांचे उत्पन्न सुध्दा मिळाल्याने काष्ठ कलेतून त्यांच्या जिवनाला सुध्दा आकार मिळत आहे.
विजय मानकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : अंगात कला कौशल्याचा विकास साधल्यास त्या कला गुणातून केव्हाही संधी साधून लाभ घेता येतो. याचे एक जिवंत उदाहरण जांभळी येथील जोहरलाल मडावी यांच्या कामातून पाहावयास मिळत आहे. पोळयाचा सण येत असल्याचे लक्षात घेत त्यांनी काष्ठ कलेतून नंदी बैल बनविण्याचा निर्धार केला. त्यांचा हा प्रयोग यशस्वी ठरला. आपल्या सफाईदार कोरीव कामातून सागावान लाकडापासून नंदी बैल तयार केले ते नंदी बैल हातोहात विकले जात असून त्यांना यातून ५० हजार रुपयांचे उत्पन्न सुध्दा मिळाल्याने काष्ठ कलेतून त्यांच्या जिवनाला सुध्दा आकार मिळत आहे.
येत्या ३० सप्टेंबरला पोळयाचा सण असून महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या सणाला शेतकरी वर्ग आपला जीवलग मित्र असलेल्या बैलांची पूजा करतो. तसेच मातीच्या नंदीची किंवा लाकडाच्या नंदी बैलाची सुध्दा पूजा केली जाते.पोळ्याचा दुसरा दिवस तान्हा पोळा म्हणून साजरा केला जातो.या दिवशी लहान बालके लाकडाचे नंदी बैल तोरणात नेतात.मुलांना नंदीच्या पायात लाकडाचे चाक असलेले सुंदर नक्षीदार नंदीबैल खूप आवडतात म्हणून या वेळी बाजारात नक्षीदार नंदी बैलांना खूप मागणी आहे.
या सणाचा दुसऱ्या बाजूने विचार केला तर दिवसेंदिवस शेती कामासाठी यंत्राचा उपयोग वाढत चालला आहे.त्यामुळे अनेक शेतकरी बैलाची जोडी आता घरी ठेवित नाहीत. परंतु पोळ्याची परंपरा टिकवून ठेवण्यासाठी लाकडाच्या नंदीची पूजा करुन सण साजरा करतात.अशात लाकडाच्या नंदीची मोठी मागणी वाढली आहे. आधी मातीचे नंदी सुध्दा मोठ्या प्रमाणावर तयार केले जायचे परंतु मातीचे नंदी बैल जास्त काळ टिकून राहत नाही.त्यामुळे लाकडाचे नंदी जास्त विकले जातात. त्यातच नक्षीदार कोरीव काम केलेल्या नंदीला अधिक मागणी आहे.
सालेकसा तालुक्यात सागवानच्या लाकडावर नक्षीकाम करुन काष्ठ कला विकसीत करण्याचे काम अनेक ठिकाणी केले जात असून अनेकांनी आपला रोजगार म्हणून काष्ठ कलेचा स्वीकार केला आहे. जोहरलाल शंभू कुंभरे मागील ३० वर्षांपासून काष्ठ कलेचे काम करीत आहे. वयाच्या २६ व्या वर्षापासून या कलेच्या माध्यमातून लाकडाच्या विविध वस्तू मोठ्या कलात्मक पध्दतीने तयार करतात.
या दरम्यान त्यांना एक मोठा अनुभव आला की वर्षातून कोणत्या वेळेत कोणती वस्तू तयार केली तर जास्त लाभकारक ठरेल. याचाच विचार करीत लोकांच्या मागणीनुसार कलात्मक वस्तु तयार करतात.पोळ्याच्या सणाला काष्ठ कलेतून निर्मित नंदी बैलाची मागणी जास्त असते.
हे लक्षात घेता मागील महिनाभरापासून लाकडाचे नंदी बनविण्याच्या कामात ते व्यस्त आहेत. त्यांचे नंदी बैल घरुनच खरेदी करुन लोक नेतात. ५६ वर्षीय जोहरलाल मडावी यांची काष्ठ कला अनेकांना प्रेरणा देणारी ठरत आहे.