१२ कोटींची कामे अडली
By admin | Published: May 9, 2017 12:52 AM2017-05-09T00:52:58+5:302017-05-09T00:52:58+5:30
जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी जिल्हा नियोजन व विकास मंडळाने ३१ मार्चच्या स्तरावर कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला.
नरेश रहिले। लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी जिल्हा नियोजन व विकास मंडळाने ३१ मार्चच्या स्तरावर कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. या निधी अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांना जि.प. ने मंजुरीसुद्धा दिली. मात्र जि.प. तील पदाधिकाऱ्यांच्या अंतर्गत कलहामुळे जि.प.तील १२ कोटी रूपयांच्या कामाचे करारनामे अडून पडले आहेत.
नियोजन व विकास मंडळाचे काही कामे ग्रामपंचायतींना, काही सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना तर काही कामे मजूर सहकारी संस्थांना वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे भाजपाकडे असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांचे करारनामे करु नये, असे लेखी पत्र अध्यक्ष उषा मेंढे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी अभियंता यांना दिले. तर काँग्रेसकडे असलेल्या शिक्षण व आरोग्य विभागाच्या कामांचे करारनामे करु नयेत, असे लेखी पत्र उपाध्यक्ष रचना गहाणे यांनी संबंधित विभागाला दिले. त्यामुळे मार्च व एप्रिल महिना संपून मे महिना सुरू झाला तरी एकही कामाचा करारनामा झाला नाही. यामुळे जिल्ह्यातील विकास कामावर विपरित परिणाम झाला आहे. या प्रकारामुळे जि.प.चे विरोधी पक्ष नेते जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी काँग्रेस व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या विकासाची वाट लावल्याचा आरोप करीत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी जिल्हा नियोजन विकास मंडळ निधीची तरतूद करुन विविध लेखा शिर्षकाखाली तो निधी जि.प. च्या विविध विभागांना जिल्हाधिकारी वितरित करतात. सन २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा नियोजन विकास मंडळाने लेखा शिर्ष ३०-५४ या अंतर्गत रस्ते बांधकामासाठी ६ कोटी रुपये जि.प. सार्वजनिक बांधकाम विभागाला सर्वसाधारण योजनेंतर्गत मिळाले. बांधकाम विभागाने या ६ कोटी रुपयांत २९ आॅगस्ट २०१७ चे समिती सभेत २०० कामांना मंजुरी प्रदान केली. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी यांच्या जुलै २०१६ च्या पत्रानुसार शिक्षण विभागाला नवीन वर्गखोल्या बांधकाम, शाळा इमारतींची दुरुस्ती यासाठी ६ कोटी रुपये मिळाले. त्याचप्रकारे आरोग्य विभाग व ल.पा. विभाग यांनाही तेवढाच निधी मिळाला. निधी उपलब्ध करुन देताना जिल्हा नियोजन विकास मंडळाने ३१ मार्च १७ पर्यंत निधी खर्ची घालण्याच्या सूचनाही दिल्यात. यातील बहुतेक कामांचे वाटप करण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार अभियंते व मजूर सहकारी संस्थांच्या बैठका झाल्या. यात बांधकाम विभाग, ल.पा. विभाग, तिर्थक्षेत्र विकास अशा बहुतेक कामांचे वाटप करण्यात आले. व काही कामे ग्रामपंचायतींना करारनामे करण्याचे पत्र देण्यात आले.
हे सर्व सुरळीत घडले असताना माशी कुठे शिंकली कुणास ठाऊक. जि.प. अध्यक्ष उषा मेंढे यांनी चक्क मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना २२ फेबु्रवारी व ४ मार्चला पत्र देऊन उपाध्यक्ष रचना गहाणे यांच्याकडील बांधकाम विभागाने कोणतेही करारनामे करु नयेत, असे लेखी पत्र दिले. ही बाब उपाध्यक्ष रचना गहाणे यांना माहीत होताच त्यांनीही २९ मार्च २०१७ सर्व यंत्रणांना लेखी पत्र देऊन शिक्षण, आरोग्य विभागाच्या कामाचे करारनामे करु नयेत, असे लेखी पत्र दिले. या पदाधिकाऱ्यांच्या अंतर्गत कलहामुळे १५ ते २० कोटी रुपये जिल्हा नियोजन मंडळाने उपलब्ध करुन दिले. ३१ मार्च पर्यंत खर्च करण्याच्या सूचना करुनही साधे करारनामे झाले नाहीत.
वर्ग खोल्या पावसाळ्यात?
शाळांना आता सुट्या लागल्या आहेत. २६ जूनला शाळा उघडण्यापूर्वी जि.प. शाळांच्या वर्ग खोल्या तयार व्हायला हव्यात मात्र पदाधिकाऱ्यांच्या अंतर्गत कलहामुळे वर्ग खोल्यांच्या बांधकामाचे आतापर्यंत करारनामे झालेच नाही. पावसाळ्यात विद्यार्थ्यांसाठी वर्गखोल्या तयार होतील का असा सवाल उपस्थित होत आहे.
‘‘ या प्रकरणाची तक्रार आयुक्तांकडे केली आहे. चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, आपसी भांडणात जनतेचा विकास थांबवू नये.
-गंगाधर परशुरामकर
जि.प. सदस्य डव्वा.
‘‘ बांधकामासाठी ९ कोटी रूपये मंजूर झाले असताना ५ कोटी ४० लाख रूपयाचे नियोजन झाले. तीन लाखांतून रस्ता होत नाही म्हणून मोठे काम व्हावे या उद्देशाने उर्वरित निधीतून मोठी विकास कामे करण्यासाठी मी पत्र लावले. चांगल्या उद्देशातून पत्र लावले असताना उपाध्यक्षांना माझ्या विभागात पत्र का लावले म्हणून महत्वाचे विभाग असलेल्या शिक्षण व आरोग्य विभागातील करारनामे थांबविण्यासाठी त्यांनी पत्र लावले. त्यानंतर आता मी आरोग्य व शिक्षण विभागातील करारनामे करण्याचे पत्र दिले आहे.
-उषा मेंढे
अध्यक्ष जि.प. गोंदिया
कामे करताना छोटे कन्फ्यूजन आल्यामुळे करारनामे करु नये असे पत्र लावले होते. परंतु १५ मार्च रोजी झालेल्या बैठकीत जि.प. अध्यक्ष यांच्या उपस्थितीत कामे सुरु करण्याचा ठराव घेऊन सोमवार (दि.८) रोजी बांधकाम समितीच्या बैठकीत त्या ठरावाला कार्यवृत्त मंजुरी मिळाली आहे. सर्व कामे सुरळीत लवकरच सुरु होतील.
-रचना गहाणे
जि.प. उपाध्यक्ष तथा बांधकाम सभापती