परिस्थिती बदलण्यासाठी काम करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2016 01:41 AM2016-01-21T01:41:53+5:302016-01-21T01:41:53+5:30
स्वच्छता मिशन पूर्णत्वास नेण्यासाठी ताकदीनिशी कामाला लागले पाहिजे. पक्के शौचालय बनले तर गाव रोगमुक्त होईल. यापूर्वी कामे स्पर्धेसाठी झाली.
रहांगडाले यांचे आवाहन : स्वच्छ भारत मिशनचा जाणीव जागृती कार्यक्रम
तिरोडा : स्वच्छता मिशन पूर्णत्वास नेण्यासाठी ताकदीनिशी कामाला लागले पाहिजे. पक्के शौचालय बनले तर गाव रोगमुक्त होईल. यापूर्वी कामे स्पर्धेसाठी झाली. त्यामुळे तीच परिस्थिती आजही आहे. तिरोडा तालुका हागणदारीमुक्त झालाच पाहिजे. आता स्पर्धेसाठी नव्हे तर परिस्थिती बदलण्यासाठी कामे करा, असे आवाहन करून तिरोडा तालुका हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आ. विजय रहांगडाले यांनी केला आहे.
तिरोडा पंचायत समिती सभागृहात स्वच्छ भारत मिशन तथा पंचायत समिती तिरोडातर्फे सोमवारी आयोजित जाणीव जागृती कार्यक्रमात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तिरोडा पंचायत समितीच्या सभापती उषा किंदरले, अतिथी म्हणून उपसभापती किशोरकुमार पारधी, प्रमुख मार्गदर्शक, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र शासनाने गौरविलेले स्वच्छतादूत भारत पाटील, जिल्हा परिषद सदस्या राजलक्ष्मी तुरकर, सुनिता मडावी, प्रिती रामटेके, जिल्हा परिषद सदस्य कैलास पटले, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मदन पटले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक संजयसिंह बैस, पंचायत समिती सदस्य नत्थू अंबुले, प्रविण पटले, प्रदीपकुमार मेश्राम, ब्रिजलाल रहांगडाले, मनोहर राऊत, माया शरणागत, जया धावडे, जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.ए.देशमुख, तिरोडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एच.एस.मानकर उपस्थित होते.
संत गाडगेबाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. बाहेरचे जग मंगळावर जायचे की चंद्रावर जायचे याचा विचार करीत आहे. आपण अद्याप मुलभूत सुविधा लोकांपर्यंत पोचवू शकलो नाही. मोबाईलची संख्या माणसापोटी दोन झाली आहे. मात्र आपल्या आयाबहीणी आजही उघड्यावरच जातात हे योग्य नसल्याचे म्हणाले. येत्या १ मे पर्यंत आपला तालुका हागणदारीमुक्त करण्यासाठी कार्य करण्याचे आवाहन याप्रसंगी विशेष स्वच्छता दूत भारत पाटील यांनी केले. पंचायत समितीचे अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच आणि लोकसहभागातून तालुका हागणदारीमुक्त करण्याची ग्वाही याप्रसंगी पंचायत समितीच्या सभापती उषा किंदरले यांनी दिली.
संचालन विस्तार अधिकारी सी.एच. गौतम यांनी तर आभार विस्तार अधिकारी एस.एस.निमजे यांनी मानले.
यशस्वीतेसाठी अतूल गजभिये, गटसमन्वयक संजय राठोड, समूह समन्वयक सुरेश पटले, अनूप रंगारी, छाया बोरकर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमात सरपंच, ग्रामसेवक, मुख्याध्यापक, आरोग्यसेविका, पंचायत समितीतील कर्मचारी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)