नगर परिषद कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 06:00 AM2019-11-09T06:00:00+5:302019-11-09T06:00:05+5:30
नगर परिषद कर्मचाऱ्यांना सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांचा पगार देण्यात आलेला नाही. तसेच दिवाळीनिमित्त कर्मचाऱ्यांना १० हजार रूपये फेस्टीवल एडवांस म्हणून दिले जातात ते सुद्धा कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले नाही. एवढेच नव्हे तर कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी ही देण्यात आलेली नाही. शिवाय नगर परिषदेतील शिक्षकांना नक्षलभत्ता लागू असताना अन्य कर्मचाऱ्यांना नक्षलभत्ता लागू करण्यात आलेला नसून भेदभाव केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील नगर परिषद कर्मचाऱ्यांना मागील दोन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. त्यात दिवाळी निमित्त देण्यात येणारा फेस्टीवल एडवांसही देण्यात आलेला नाही. सोबतच सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी दिली नसून नक्षल भत्त्यातही भेदभाव केला जात आहे. पगार व फेस्टीवल एडवांस न मिळाल्याने कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात गेली. यामुळे आपल्या मागण्यांसाठी कर्मचारी गेट मिटींगच्या आंदोलन करीत होते. मात्र मागण्यांची पूर्तता होत नसल्याचे बघून ठरविल्याप्रमाणे कर्मचाऱ्यांची शुक्रवारपासून (दि.८) कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
नगर परिषद कर्मचाऱ्यांना सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांचा पगार देण्यात आलेला नाही. तसेच दिवाळीनिमित्त कर्मचाऱ्यांना १० हजार रूपये फेस्टीवल एडवांस म्हणून दिले जातात ते सुद्धा कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले नाही. एवढेच नव्हे तर कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी ही देण्यात आलेली नाही. शिवाय नगर परिषदेतील शिक्षकांना नक्षलभत्ता लागू असताना अन्य कर्मचाऱ्यांना नक्षलभत्ता लागू करण्यात आलेला नसून भेदभाव केला जात आहे. एकंदर या सर्व कारणांमुळे नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या हाती काहीच लागले नाही व त्यांची दिवाळी अंधारात गेली.
दिवाळी साजरी करता यावी यासाठी नगर परिषद कर्मचारी युनियनच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांनी २३ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी, नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागणी केली होती. तसेच मागण्यांची पूर्तता न झाल्यास मंगळवारपासून (दि.४) गेट मिटींग व त्यानंतर शुक्रवारपासून (दि.८) कामबंद आंदोलनाचा इशारा दिला होता. विशेष म्हणजे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी चंदन पाटील सुटीवर असून प्रभारी मुख्याधिकारी जाधव यांनी काहीच केले नाही व त्यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात गेल्याचे कर्मचारी सांगत आहेत.
आपल्या रास्त मागण्यांकडे नगर परिषद प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने त्रस्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून (दि.८) अखेर कामबंद आंदोलन सुरू केले. नगर पालिका कर्मचारी युनियनचे अध्यक्ष जहीर अहमद यांच्या नेतृत्वात हे कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले असून कर्मचाऱ्यांनी नगर परिषद कार्यालयाच्या गेटमध्ये एकत्र येऊन नारेबाजी केली. नगर परिषद प्रशासनाविरोधात नारेबाजी करीत कर्मचाऱ्यांनी आपला रोष व्यक्त केला. सुरू असलेल्या या आंदोलनात नगर परिषदेतील सुमारे ७०० स्थायी व ५० अस्थायी कर्मचाºयांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, नगर परिषदेतील सर्वच कर्मचारी कामबंद आंदोेलनात सहभागी झाल्यामुळे शहरवासीयांच्या समस्यांत वाढ होणार यात शंका नाही. सफाई कर्मचारी कामावर न आल्यास सफाई होणार नाही व यामुळे शहरवासीयांचे आतापासूनच टेंशन वाढले आहे.
मुख्याधिकारी संपर्क क्षेत्राबाहेर
लोकसभा निवडणुकीसाठी इलेक्शन ड्यूटी लागल्यापासून मुख्याधिकारी चंदन पाटील संपर्क क्षेत्राबाहेर आहेत. निवडणूक आटोपून आता १५ दिवस होत आले तरिही ते रूजू झाले नसून त्यांचा प्रभार जाधव यांच्याकडे देण्यात आला आहे. कर्मचारी अडचणीत असतानाही मुख्याधिकारी सुट्यांवर राहत असल्याने कर्मचाऱ्यांत मुख्याधिकाऱ्यांप्रतीही चांगलाच रोष दिसून येत आहे. शुक्रवारीही (दि.८) मुख्याधिकारी पाटील यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ते संपर्क क्षेत्राबाहेरच होते.
मागण्यांची पूर्तता होतपर्यंत कामबंद
दोन महिन्यांचा पगार, फेस्टीवल एडवांस, सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी तसेच नक्षल भत्त्यातील भेदभाव या सर्व मागण्या रास्त असून नगर परिषद प्रशासन मात्र कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता आपल्या रास्त मागण्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत हे कामबंद आंदोलन सुरू राहणार असा पवित्रा कर्मचाºयांनी घेतला आहे.
संपूर्ण कामकाज ठप्प
नगर परिषदेतील सर्वच कर्मचारी या कामबंद आंदोलनात सहभागी झाल्यामुळे नगर परिषदेतील सर्वच विभागांचा कारभार बंद पडून होता. एकंदर नगर परिषदेतील सर्वच कामकाज ठप्प पडले होते. यामुळे मात्र आपल्या कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची अडचण झाली. कामबंद असल्यामुळे नागरिकांना आल्या पावली परत जावे लागत असल्याचे दिसले.