नगर पंचायत कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:28 AM2017-07-19T00:28:54+5:302017-07-19T00:28:54+5:30
तत्कालीन ग्रामपंचायत मधील कर्मचाऱ्यांना नगर पंचायतच्या नियमित आस्थापनेवर समावेशन न केल्यामुळे
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : तत्कालीन ग्रामपंचायत मधील कर्मचाऱ्यांना नगर पंचायतच्या नियमित आस्थापनेवर समावेशन न केल्यामुळे उद्या बुधवार (१९) पासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. नगराध्यक्ष पोर्णिमा शहारे यांना कर्मचाऱ्यांनी लेखी निवेदन दिले आहे. यामुळे नगरवासीयांना मिळणाऱ्या सेवा प्रभावित होणार आहेत.
पूर्वी येथे ग्रामपंचायत अस्तित्वात होती. त्याचे रुपांतर नगर पंचायतमध्ये झाले. त्यावेळी अनेक अस्थायी कर्मचारी म्हणून कार्यरत होते. विभागीय आयुक्त नागपूर यांनी २ कर्मचाऱ्यांना नगर पंचायत आस्थापनेवर घेतले. मात्र इतर कर्मचाऱ्यांना विनंती, पत्र व्यवहार करुनही सेवेत सामावून घेण्यात आले नाही. येथील ९० टक्के कर्मचारी अनुभवी व अर्हताधारक आहेत. आज ना उद्या भविष्य उज्वल होईल या आशेने अनेक वर्षापासून येथे कार्यरत आहेत. यात बऱ्याच लोकांनी आपले उमेदीचे वय यात घालवले. मात्र प्रशासन त्यांना नियमित आस्थापनेवर समावून घेण्यास कुचराई करीत आहे.