आजी-माजी सभापतींच्या प्रभागात कामांचा वर्षाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 12:20 AM2018-01-20T00:20:15+5:302018-01-20T00:20:35+5:30

नगर परिषदेच्या निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याने १७ कोटींची निविदा प्रक्रिया नुकतीच रद्द करण्यात आली. हा विषय ताजा असतानाच ७३ कामांसाठी काढण्यात आलेल्या या निविदांमध्ये सर्वाधीक कामांची तरतूद नगर परिषदेतील आजी व माजी बांधकाम सभापतींच्या प्रभागात करण्यात आली ....

Work of Premises in the division of grand-aged candidates | आजी-माजी सभापतींच्या प्रभागात कामांचा वर्षाव

आजी-माजी सभापतींच्या प्रभागात कामांचा वर्षाव

googlenewsNext
ठळक मुद्देसर्वाधिक कामे प्रभाग क्रमांक २ मध्ये : अन्य प्रभागांसोबत पक्षपात

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नगर परिषदेच्या निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याने १७ कोटींची निविदा प्रक्रिया नुकतीच रद्द करण्यात आली. हा विषय ताजा असतानाच ७३ कामांसाठी काढण्यात आलेल्या या निविदांमध्ये सर्वाधीक कामांची तरतूद नगर परिषदेतील आजी व माजी बांधकाम सभापतींच्या प्रभागात करण्यात आली असल्याची बाब उघडकीस आली आहे. यामुळे आजी-माजी सभापतींच्या प्रभागातच कामांचा वर्षाव झाल्याची चर्चा न.प.च्या वर्तुळात आहे.
विशेष रस्ता अनुदान योजना, दलितोत्तर अनुदान योजना, नगरोत्थान योजना व दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत नगर परिषदेने ७३ कामांसाठी निविदा काढल्या होत्या. यात ५० लाखांच्या आत ११ तर ५० लाखांच्या वर ६२ अशा दोन टप्प्यात निविदा काढण्यात आल्या. ही कामे आपल्या मर्जीतील कंत्राटदारांनाच मिळावी यासाठी सेटींग करून निविदा स्वीकारण्याची तारीख वाढविण्यात आल्याचे बोलल्या जाते. त्यातल्या त्यात आपल्याच कंत्राटदारांना कामे मिळावी यासाठी ऐनवेळी आरएमसी प्लांटची अट टाकण्यात आल्याने हा प्रकार उघडकीस आला. या सर्व प्रकारा विरोधात काही कंत्राटदारांनी जिल्हाधिकाºयांकडे तक्रार केली. तर काहींनी नागपूर उच्च न्यायालयातून या निविदांवर स्थगिती आणली.
नगर परिषदेत झालेला हा प्रकार सध्या शहरात चांगलाच चर्चेत आहे. जनतेच्या पैशांची आपल्या मर्जीने उधळण केली जात असल्याने शहरवासी संतप्त आहेत. शहराचा विकास व्हावा या भावनेतून ज्यांना निवडून नगर परिषदेत पाठविण्यात आले तेच आता आपल्या मर्जीने कामकाज चालवित असल्याचेही दिसून येत आहे. नगर परिषदेने काढलेल्या या ७३ कामांत सर्वाधीक कामे नगर परिषदेतील आजी व माजी बांधकाम सभापतींच्या प्रभागातील असल्याचे दिसत आहे. यातून शहरातील अन्य प्रभागांत विकास कामांची गरज नाही काय असा सवाल शहरवासीय करीत आहे. ७३ कामांच्या या निविदांत ५० लाखांच्या आतील ६२ कामांत प्रभाग क्रमांक १ मधील १५, प्रभाग क्रमांक २ मधील १७ कामे आहेत. याशिवाय, प्रभाग क्रमांक १ व २ तसेच प्रभाग क्रमांक ४ व ७ मधील संयुक्त कामेही आहेत. तर चार कामे सोडून ५० लाखांच्या वरील ११ कामांत प्रभाग क्रमांक १ मधील १ व प्रभाग क्रमांक २ मधील ३ कामे असून यासह अन्य प्रभागातील कामांचा समावेश आहे. विशेष म्हणजे याशिवाय, प्रभाग क्रमांक १,२ व ३, प्रभाग क्रमांक २ व ३ तसेच प्रभाग क्रमांक ५ व ६ मधील संयुक्त कामेही आहेत. आता येथे प्रभाग क्रमांक १ व प्रभाग क्रमांक २ कुणाचे आहेत याबाबत शहरवासीयांना वेगळे सांगण्याची गरज नाही.
निविदा रिकॉल करणार
आपल्या लाडक्या कंत्राटदारांच्या हितार्थ करण्यात आलेला निविदांतील हा घोळ उघडकीस आल्यानंतर तडकाफडकी निविदा रद्द करण्यात आल्या. यासाठी शुद्धीपत्रकात टापयींगची चूक झाल्याचे कारण पुढे करण्यात आले. ही सर्व केवीलवाणी धडपड कशासाठी हे सर्वांनाच ठाऊक आहे. दरम्यान आता पुन्हा या निविदा रिकॉल केल्या जाणार आहेत. निविदांना घेऊन उघडकीस आलेला व त्यानंतर निविदा रद्द करण्यात आल्याच्या या घटनेने नगर परिषद कामकाजावर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Web Title: Work of Premises in the division of grand-aged candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.