भर उन्हात काम : पडत नाही १०० रूपये रोजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2017 12:45 AM2017-05-27T00:45:49+5:302017-05-27T00:45:49+5:30
येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तलाव खोलीकरणाचे काम एप्रिल महिन्यापासून सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खातीया : येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तलाव खोलीकरणाचे काम एप्रिल महिन्यापासून सुरू आहे. येथे अचानक जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी भेट दिली. त्यावेळी भर उन्हा काम करूनही १०० रूपयेसुद्धा रोजी पडत नसल्याची कैफियत महिला मजुरांनी मांडली.
जिल्हाधिकारी काळे यांनी मंगळवारी २३ मे रोजी खातिया येथे तलाव खोलीकरणाच्या कामावर भेट दिली. मजुरांनी समस्या मांडताना त्यांना सांगितले की, एवढ्या अल्पशा रोजीत कुटुंबाचे पालन पोषण करता येत नाही. अनेक महिला आपल्या मुलांना सोडून रोजगार हमीच्या कामावर येत आहेत. त्यामुळे १०० रूपयांपेक्षा अधिकची रोजी त्यांना देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी, जेवढे काम तुम्ही कराल तेवढीच तुम्हाला रोजी मिळेल, अधिक काम कराल तर अधिक मजुरीत वाढ होईल, असे सांगून त्यांची समजूत काढली व डिसेंबर महिन्यापासून रोजगार देण्याची माहिती दिली.
खातिया येथे तलाव खोलीकरण कामांतर्गत ७५ रूपये ते १४० रूपयांपर्यंत मजुरांची रोजी कमी निघाली. त्यामुळे कर्मचारी मजुरामजुरामध्ये भेदभाव करीत असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी काळे यांच्यासह उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, तलाठी बोखडे, पोलीस पाटील विनायक राखडे, सरपंच केशोराव तावाडे, उपसरपंच सूरजलाल खोटेले, ग्रामसेविका कुंदा मेंढे आदी उपस्थित होते.