कामगारांनी अधिकारांची जाणीव ठेवावी!
By admin | Published: March 10, 2017 12:44 AM2017-03-10T00:44:30+5:302017-03-10T00:44:30+5:30
देशातील ९३ टक्के कामगार हे असंघटीत क्षेत्रात काम करीत आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकारी, सर्वोच्च न्यायालय
आणेकर : कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम
गोंदिया : देशातील ९३ टक्के कामगार हे असंघटीत क्षेत्रात काम करीत आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकारी, सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांनी अशा क्षेत्रातील कामगारांचे हित रक्षणासाठी तसेच त्यांच्या कल्याणासाठी व त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी विधी सहाय्य योजना २०१५ कार्यान्वित केली आहे. या योजनेंतर्गत अशा कामगारांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचविण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदिया हे कार्यालय सदैव तत्पर आहे. त्यामुळे जिल्ह्यातील घरगुती धुणी-भांडी- स्वयंपाकाची कामे करणाऱ्या महिला, इमारत बांधकामावरील कामगार, दुकानात काम करणारे, शेतात काम करणारे कामगार यांनी आपल्या अधिकारांची जाणीव ठेवावी व शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कामगार न्यायालयाच्या न्या.एन.एस. आणेकर यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, कामगार न्यायालय, सहायक कामगार आयुक्त कार्यालय, वकील संघ कामगार न्यायालय गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाद्वारे असंघटीत क्षेत्रातील कामागारांना विधी सहाय्य योजना २०१५ या योजनेच्या जनजागृतीसाठी गोंदिया येथील घरगुती काम करणाऱ्या महिला, इमारत बांधकामावरील कामगार व इतर क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांकरिता कायदेविषयक जनजागृती कार्यकम कामगार न्यायालयात घेण्यात आले. त्यावेळी उदघाटक म्हणून न्या. आणेकर बोलत होत्या.
यावेळी सरकारी कामगार अधिकारी जीवन बोरकर, दुकाने निरीक्षक मंजुषा पौनीकर, अॅड. राजकुमार बोंबार्डे, अॅड.सी.के. बढे यांची प्रमुख वक्ते म्हणून उपस्थिती होती. यामध्ये सरकारी कामगार अधिकारी जीवन बोरकर यांनी त्यांच्या विभागांतर्गत राबविण्यात येणारी इमारत बांधकाम कामगारांसाठी कल्याणाची योजना, याबाबत माहिती दिली. या योजनेंतर्गत ज्या कंत्राटदारांकडे कामगार कामे करतात त्या कंत्राटदाराचे प्रमाणपत्र घेवून कामगारांनी आवश्यक कागदपत्रे घेवून त्यांनी सहायक कामगार आयुक्त कार्यालयात नोंद करावी व मिळणाऱ्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. दुकाने निरीक्षक मंजुषा पौनीकर यांनी घरगुती कामे करणाऱ्या महिलांनी त्यांची नोंदणी सहायक कामगार आयुक्त कार्यालयात करून योजनेंतर्गत लाभ घ्यावा, असे सांगितले. वकील संघाचे अध्यक्ष अॅड. राजकुमार बोंबार्डे यांनी कामगार अपघात नुकसान भरपाई कायदा, याबाबत मार्गदर्शन केले. कामगारांनी आपले हक्क मिळविण्यासाठी न्यायालयात दाद मागावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. वकील संघाचे सचिव अॅड.सी.के. बढे यांनी कामगारांच्या योजना प्रभावीपणे राबविण्यास सांगितले.
यावेळी असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या कल्याणाच्या योजना व विविध कायद्यांची माहिती उपस्थित कामगारांना देण्यात आली.
संचालन जी.पी. नखाते यांनी केले. आभार एस.यु. थोरात यांनी मानले. कार्यक्रमासाठी पी.डी. देशपांडे, प्रमोदिनी तेलंग, धुर्वे तसेच कामगार न्यायालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)