रोहयोच्या २५ हजार मजुरांना मिळणार कामगारांचा दर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 08:57 PM2018-05-06T20:57:40+5:302018-05-06T20:57:40+5:30
बेरोजगारीवर मात करण्यासाठी यशस्वी ठरलेली महात्मा गांधी रोजगार हमी योजना देशातील मजूरांच्या हाताला काम देत आहे. सन २०१७-१८ या वर्षात गोंदिया जिल्ह्याने रोहयोमध्ये देशपातळीवर नाव लौकीक होईल असे काम केले.
नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : बेरोजगारीवर मात करण्यासाठी यशस्वी ठरलेली महात्मा गांधी रोजगार हमी योजना देशातील मजूरांच्या हाताला काम देत आहे. सन २०१७-१८ या वर्षात गोंदिया जिल्ह्याने रोहयोमध्ये देशपातळीवर नाव लौकीक होईल असे काम केले. देशात पहिल्या क्रमांकावर येण्याच्या शर्यतीत गोंदिया जिल्हा आहे. गोंदिया जिल्ह्याने ९० व त्यापेक्षा अधिक दिवस काम देऊन गोंदिया जिल्ह्यातील २५ हजार मजुरांना कामगारांचा दर्जा देण्याचा संकल्प पूर्ण केला आहे.
सन २०१७-१८ या वर्षात रोहयोच्या कामावर गोंदिया जिल्ह्यातील ६८ हजार ६५५ कुटुंबे होती. या कुटुंबातील १ लाख ९ हजार ३२३ मजूरांनी ७ लाख ९५ हजार १३५ मनुष्यदिवस काम केले. गोंदिया जिल्ह्यात या वर्षभरात झालेल्या रोहयोच्या कामावर २६८ कोटी ४७ लाख ५७ हजार रूपये खर्च करण्यात आले. त्यातील २०३ कोटी १५ लाख ७४ हजार रूपये मजूरीवर खर्च करण्यात आल्याने हे पैसे लोकांच्या खिशात गेले आहेत. सद्यस्थितीत जिकडे-तिकडे बेरोजगारी वाढली आहे. परंतु या बेरोजगारीवर मात करण्यासाठी थोड्याफार प्रमाणात रोहयो ही एक उपाय ठरली आहे.
गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी या जिल्ह्यातील मजूरांना अधिक दिवस मजूरी मिळावी सोबतच त्या मजूरांना कामगारांचा दर्जा मिळाल्यास त्यांना शासनाच्या २८ योजनांचा लाभ सहजरित्या घेता येईल. यासाठी बहुतांश मजूर कामगारांच्या कक्षेत यावेत याकरिता प्रयत्न केलेत.
सन २०१७-१८ या वर्षात ९० किंवा त्यापेक्षा अधिक दिवस रोहयोवर काम करणाऱ्यांची संख्या २५ हजार ६२८ आहे. त्यात आमगाव तालुक्यात २ हजार ७८४, अर्जुनी-मोरगाव १ हजार ३२३, देवरी ७ हजार ९८८, गोंदिया २ हजार १७५, गोरेगाव १ हजार ५८५, सडक-अर्जुनी ३२४, सालेकसा ५ हजार २३१, तिरोडा तालुक्यात ४ हजार २१८ मजूरांचा समावेश होता. रोहयोमधून वृक्षलागवड व रोपवाटीकेचे काम केले जाते. त्या कामाचे दिवस वगळून ९० दिवस काम करणाºया मजूरांना कामगारांचा दर्जा देण्यात येत आहे.
कामगारांना मजुरीपेक्षा अधिक लाभ
रोहयोत काम करणाऱ्या मजुराला कामगाराचा दर्जा मिळाल्यास कामगार कार्यालयात मार्फत त्यांना मिळणारा लाभ हा मजुरीपेक्षा अधिक असल्याने गोंदिया जिल्ह्यातील मजूरांना अधिक संख्येत कामगारांचा दर्जा मिळावा यासाठी जिल्हाधिकारी काळे यांनी पुढाकार घेतला. कामगाराच्या दोन पाल्यांना १ ली ते ७ वी साठी दरवर्षी दोन हजार ५०० रूपये ८ वी ते १० वी साठी दरवर्षी ५ हजार, दोन पाल्यांना १० वी व १२ वी मध्ये ५० टक्के वा अधिक गुण प्राप्त झाल्यास प्रोत्साहनपर १० हजार रुपये, ११ वी व १२ वीच्या शिक्षणासाठी दरवर्षी १० हजार, दोन पाल्यास वा पत्नीस पदवीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या प्रवेश पुस्तकासाठी दरवर्षी २० हजार, वैद्यकीय शिक्षणासाठी १ लाख रुपय, अभियांत्रिकी शिक्षणासाठी दरवर्षी ६० हजार, पदवी शिक्षणासाठी २० हजार व पदवयुत्तर शिक्षणासाठी दरवर्षी २५ हजार दोन पाल्यांना संगणकाचे शिक्षण (एमएसआयटी) मोफत दिले जाईल अथवा उत्तीर्ण असल्यास एमएससीआयटी प्रमाणपत्र सादर करुन शुल्क मिळविता येईल, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ कामगाराला अथवा त्यांच्या कुटुंबियांना गंभीर आजाराच्या उपचारासाठी १ लाख सहाय्य, कामगारास ७५ टक्के अपंगत्व किंवा कायमचे अपंगत्व आल्यास २ लाख अर्थसहाय्य, कामगाराच्या पत्नीस दोन जिवीत अपत्यांपर्यंत नैसर्गिक प्रसूतीसाठी १५ हजार ते २० हजार, एका मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या नावे १८ वर्षासाठी १ लाख मुदत बंद ठेव, व्यसनमुक्ती केंद्रांतर्गत उपचाराकरिता ६ हजार अर्थसहाय्य, कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्यास त्याच्या वारसास ५ लाख, नैसर्गिक मृत्यू झाल्यास कुटुंबाला २ लाख, घरखरेदी व घरबांधणीसाठी बँकेकडून घेतलेल्या गृहकर्जावरील ६ लाख पर्यंत व्याजाची रक्कम अथवा २ लाख अर्थसहाय्य मंडळामार्फत मिळेल, आवास योजनेसाठी २ लाख, कामगाराचा मृत्यू झाल्यास वारसदारास १० हजार, कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीस अथवा पतीला सलग पाच वर्षे २४ हजार, कामगाराला स्वत:च्या पहिल्या विवाहासाठी ३० हजार, ३१ आॅगस्ट २०१४ रोजी नोंदणी जिवीत असलेल्या नोंदीत कामगाराला दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदीसाठी दर कामगार ३ हजार, कामगाराच्या पाल्यांना व्यक्तिमत्व विकास पुस्तक संच, कामगारांना बांधकामाची उपयुक्त/आवश्यक अवजारे खरेदीसाठी दर कुटूंब ५ हजार रूपये, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना लागू, कामगाराला सुरक्षा संच पुरविणे अशा योजनांचा लाभ मिळतो.