कृषी विभागामार्फत सेंद्रीय शेती विषयावर कार्यशाळा
By admin | Published: June 12, 2016 01:35 AM2016-06-12T01:35:05+5:302016-06-12T01:35:05+5:30
जिल्ह्यातील ‘एमएसीपी’ प्रकल्प अंतर्गत स्थापन झालेल्या प्रत्येक शेतकरी उत्पादक कंपनीतील ५० सभासद शेतकऱ्यांच्या सेंद्रिय शेतीकरिता
गोंदिया : जिल्ह्यातील ‘एमएसीपी’ प्रकल्प अंतर्गत स्थापन झालेल्या प्रत्येक शेतकरी उत्पादक कंपनीतील ५० सभासद शेतकऱ्यांच्या सेंद्रिय शेतीकरिता समूहाची निवड करण्यात आली आहे. या योजनेबद्दल सविस्तर माहिती व प्रचार-प्रसाराकरिता जैन कुशल भवन पुराना बस स्टँड रोड, गोंदिया येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान परंपरागत कृषी विकास योजना २०१५-२०१६ सेंद्रीय शेती या योजनेंतर्गत जिल्हा कृषी अधीक्षक गोंदिया, प्रकल्प संचालक कृषी अधीक्षक गोंदिया तसेच प्रकल्प संचालक आत्मा गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. मार्गदर्शक म्हणून सेंद्रीय शेती तज्ज्ञ हेमंत चव्हाण नागपूर, कृषि अधीक्षक तथा प्रकल्प संचालक आत्मा गोंदियाचे चव्हाण, उपविभागीय कृषी अधिकारी गोंदिया नाईनवाड, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापन आत्मा गोरेगावचे पटले, सेंद्रीय भाजीपाला चिराग पाटील, भात शेती उत्पादक समूहाचे अध्यक्ष प्यारेलाल गौतम, सचिव टोपराम फुकटकर, सुरेंद्र मेंढे (एनयूएस) शेतकरी उत्पादक कंपनीचे कोषाध्यक्ष उपस्थित होते.
कार्यशाळेचे मुख्य मार्गदर्शक हेमंत चव्हाण यांनी सेंद्रीय शेती ही आजच्या काळाची गरज आहे. सेंद्रीय शेती करुन जमिनीचे आरोग्य टिकवून सर्वांनी विषमुक्त शेतमाल उत्पादन करायला पाहिजे, सेंद्रीय शेतमालाचे फायदे, सेंद्रीय शेतमालाला मोठा आंतरराष्ट्रीय बाजार उपलब्ध असल्याचे सांगितले.
चव्हाण साहेब प्रकल्प संचालक आत्मा यांनी परंपरागत कृषी विकास योजना ही राष्ट्रीय शाश्वत अभियान अंतर्गत आहे. या योजनेमध्ये ४० टक्के राज्य शासनाचा व ६० टक्के केंद्र शासनाचा अनुदान असून शेतकऱ्यांसाठी १०० टक्के अनुदानीत आहे. ही योजना ३ वर्ष कालावधीत राबविण्यात येणार आहे, अशी माहिती दिली.
उपविभागीय कृषी अधिकारी नाईकवाड यांनी सेंद्रीय शेतीचे फायदे व या योजनेंतर्गत जे शेतकरी सेंद्रीय शेती करतील त्यांना ३ वर्षानंतर सेंद्रीय शेती शेतमाल उत्पादक म्हणून प्रमाणित करण्यात येईल, अशी माहिती दिली.
गटसमन्वयक योगेंद्र बिसेन, चिराग पाटील संस्था तिल्ली (मोहगाव) यांनी आपण देशी गाईपासून घरगुती खत, जिवामृत, बिजामृत, घनामृत, दशपर्णी तयार करण्याची पद्धत व घरगुती खतांचा वापर करुन रासायनिक खत किटकनाशकाचा वापर टाळून चांगले उत्पादन घेऊ शकतो.
या प्रकारचा उपक्रम आम्ही संस्थेमार्फत मागील ३ वर्षांपासून राबवित आहोत. ज्या शेतकऱ्यांनी या घरगुती खताचा वापर केला त्यांना समाधानकारक उत्पन्न मिळाले असे सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन कृषी पणन तज्ज्ञ आत्मा गोंदिया टेंभूर्णेकर व आभार सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा गोरेगाव पटले यांनी केले. (वार्ताहर)