जागतिक कुटुंब दिवस; कौटुंबिक सलोखा जपणारा गोंदियातील बनोठे परिवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 11:33 AM2020-05-15T11:33:34+5:302020-05-15T11:35:57+5:30
घरातील संयुक्त कुटुंबांची जागा फ्लॅट संस्कृतीमुळे विभक्त कुटुंब पध्दतीने घेतली. पती,पत्नी आणि मुले ऐवढ्या पुरतेच मर्यादित झाले. मात्र सालेकसा तालुक्यातील कुणबीटोला येथील बनोठे कुटुंब अजुनही संयुक्त कुटुंबांचा वारसा जपत समाजासमोर आदर्श ठेवला आहे.
विजय मानकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मातीच्या घरांची जागा सिमेंटच्या घरांनी घेतली. तर घरातील चुलीची जागा आधुनिक काळात गॅस सिलिंडरने घेतली आहे. मातीच्या भिंती पडत जावून सिमेंटचे जंगल तयार होत गेले आणि कुटुंबातील सदस्यांचे अंतर वाढू लागले. घरातील संयुक्त कुटुंबांची जागा फ्लॅट संस्कृतीमुळे विभक्त कुटुंब पध्दतीने घेतली. पती,पत्नी आणि मुले ऐवढ्या पुरतेच मर्यादित झाले. मात्र सालेकसा तालुक्यातील कुणबीटोला येथील बनोठे कुटुंब अजुनही संयुक्त कुटुंबांचा वारसा जपत समाजासमोर आदर्श ठेवला आहे.
८५ वर्षीय कुटुंब प्रमुख झलकन सुमेशसिंह बनोठे यांनी आपल्या कुटुंबांना एका सुत्रात बांधून ठेवले आहे. शेती व शेतीपुरक व्यवसायातून आपल्या मुलांना व कुटुंबातील इतर सदस्यांना कर्तव्यावर सतत निर्विवाद कार्यरत ठेवण्याची संधी त्यांनी निर्माण केली. त्याच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य पारिवारिक एकतेला प्रथम महत्त्व देत आपल्या वाट्याला आलेले कार्य आपले कर्तव्य म्हणून पार पाडतो. हीच बनोठे कुटुंबियांची मोठी ताकद म्हणावी लागेल. बनोठे कुटुंबात झलकन बनोठे कुटुंब प्रमुख असून आज ते ८५ वषार्चे झाले तरी त्यांच्या मार्गदर्शन व सल्लाशिवाय घरात कुठलेही निर्णय घेतले जात नाही. ते सुध्दा नेहमी आपल्या मुलाच्या सल्याची कधीही अवहेलना करीत नाही. त्यामुळे काम आणि निर्णय घेण्यात समन्वय साधण्यात नेहमी यश मिळते.
झलकन बनोठे याची पत्नी तरासनबाई बनोठे ह्या ७८ वर्षाच्या असून त्यांनी पतीच्या खांद्याला खांदा लावून काम केले. या दोघांची तीन मुले असुन यात सर्वात मोठा नुतनलाल बनोठे ५३ वषार्चा त्याची पत्नी सुशीला बनोठे ५० वषार्ची, दुसरा मुलगा सेवकलाल बनोठे ५० वर्ष वयाचा त्याची पत्नी ४६ वर्ष वयाची, तिसरा मुलगा सेवकलाल बनोठे ४५ वर्षाच्या आणि त्याची पत्नी पुष्पाबाई बनोठे ४५ वर्ष वयाची असून तिघांनाही मुल बाळ आहेत. नुतनलाल बनोठे आणि सुशीला बनोठे याच्या एकुण सहा मुली असून तीन मुलीचे लग्न होऊन सासरी गेल्या आहेत. तर तीन मुलींमध्ये रेणुका बनोठे (२६), प्रगती बनोठे (२२) आणि पायल (१९) याचा समावेश आहे. दुसरा मुलगा सेवकलाल बनोठे हा शिक्षक आहेत. अध्यापन कार्य करण्याच्या व्यतीरिक्त नेहमी घरच्या शेतीवाडीकडे व इतर कामाकडे लक्ष देतात. सेवक बनोठे आणि त्याची पत्नी ओमकुवरबाई बनोठे याची दोन अपत्ये असुन मुलगी नंदिनी बनोठे (२३) आणि मुलगा दुष्यंत बनोठे (१९) शिक्षण घेत आहेत. तिसरा मुलगा येवकलाल बनोठे व त्याची पत्नी पुष्पा याची तीन मुले-मुली असुन मुलगा मुकेश (१९), मुलगी भारती बनोठे (१६) आणि छोटा मुलगा लक्की बनोठे (१४) यांचा समावेश आहे. येवक बनोठे वर्षभर शेतीच्या कामात लक्ष देत असुन खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामात जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल यासाठी नेहमी प्रयत्न करतात. सध्या विभक्त कुटुंब पध्दतीत बनोटे यांचे संयुक्त कुटुंब आदर्श ठरत आहे.
२५-३० लोकांना वर्षभर मिळतो रोजगार
झलकन बनोठे याचे कुटुंब उन्नत शेतीकरिता परिसरात ओळखले जाते. शेतीपुरक व्यवसाय सुद्धा मोठ्या जिद्द व चिकाटीने करतात. शेती आणि शेतीपुरक व्यवसायाच्या माध्यमातुन गावातील आणि परिसरातील २५-३० महिला पुरूषांना नियमित रोजगार उपलब्ध करून देतात. यात दोन्ही हगांमात शेतीमध्ये जमिनीची मशागत शेतातील रोवणी व धानाच्या कापणीची कामे करतात.