शेळीपालनातून सावरला ‘माधुरी’चा संसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 10:13 PM2018-02-01T22:13:04+5:302018-02-01T22:13:31+5:30
आर्थिक उत्पन्नाचे कसलेही साधन नसलेल्या तिरोडा तालुक्याच्या सोनेखारी येथील माधुरी तेजराम धुर्वे यांनी राणी लक्ष्मीबाई स्वयंसहायता महिला बचत गटात प्रवेश केला. गटातून कर्ज घेवून शेळीपालनाचा व्यवसाय सुरू केला व आपला संसार सावरला.
ऑनलाईन लोकमत
गोंदिया : आर्थिक उत्पन्नाचे कसलेही साधन नसलेल्या तिरोडा तालुक्याच्या सोनेखारी येथील माधुरी तेजराम धुर्वे यांनी राणी लक्ष्मीबाई स्वयंसहायता महिला बचत गटात प्रवेश केला. गटातून कर्ज घेवून शेळीपालनाचा व्यवसाय सुरू केला व आपला संसार सावरला.
सोनेखारी येथे १६ डिसेंबर २०१३ रोजी सदर बचत गटाची स्थापना झाली. त्यात माधुरी सदस्य आहेत. उत्पन्नाचे साधन नसल्याने त्या जास्त बचत करू शकत नव्हत्या. त्यांची मासिक बचत ५० रूपये होती. गटात प्रवेश केल्यावर पाच हजार रूपयांचे अंतर्गत कर्ज घेवून त्यांनी एक शेळी खरेदी केली. तिचे चांगले पालन केल्यावर तिने दोन पिल्ले दिले. त्यांचेही चांगले पालन केले. ते मोठे झाल्यावर त्यांच्याकडे आता तीन शेळ्या झाल्या.
त्यानंतर बचत गटाला १५ हजार रूपयांचा फिरता निधी (आरएफ) मिळाला. ते १५ हजार रूपयांची माधुरी यांनीच उचल केली व त्यातून तीन शेळ्या खरेदी केल्या. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात भर पडू लागली. वर्षभरानंतर बचत गटाची मासिक बचत १०० रूपये प्रत्येकी करण्यात आले.
सासू घरी राहत असत. आता घरच्या सहा शेळा सासू चारायला नेवू लागल्या. इकडेतिकडे बसून राहण्यापेक्षा व दुसºयांच्या शेळ्या चारण्यापेक्षा घरच्याच शेळ्या चारायला नेण्यासाठी सासूने माधुरी यांना सहकार्य केले. त्यामुळे उत्पन्नात वाढ होवू लागली. आधी त्यांच्याकडे उत्पन्नाचे साधन नव्हते. पण गटात आल्यानंतर एका शेळीपासून आज त्यांच्याकडे १० शेळ्या झाल्या. ही वाढ म्हणजेच त्यांचे उत्पन्न आहे. मजुरी व शेळ्या विक्रीतून आता त्या अंतर्गत कर्ज व खेळत्या निधीची योग्यरित्या परतफेड करीत आहेत.
गटात आल्यामुळेच त्यांच्या कुटुंबाला एक स्वयंरोजगार मिळाला आहे. त्यांच्या घरी सासू, पती, दोन मुले व त्या असा पाच जणांचा कुटुंब आहे. पती मजुरी करतात व सासू शेळ्या चारतात.
मूल लहान असल्यामुळे माधुरी मजुरीला जात नाही. पण गटात समाविष्ट झाल्यामुळे त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास व आर्थिक उत्पन्नात भर पडला.
गटामुळे व्यवहार कौशल्याचे ज्ञान
गटात येण्यापूर्वी माधुरी यांना गट म्हणजे काय, परिचय म्हणजे काय, हे कळत नव्हते. चार चौघांमध्ये बोलता येत नव्हते. मात्र गटात आल्यावर त्या बोलक्या झाल्या. स्वत:चा परिचय सांगू लागल्या. गटापासून त्यांना खूप काही शिकायला मिळाले. त्या घराबाहेर पडल्या. आजची महिला कशी असावी, याची जाण त्यांना झाली. बाहेरचे व्यवहार करायला शिकल्या. त्या बँक व्यवहारही करू लागल्या. त्यामुळे त्यांनी आपले गट व महिला आर्थिक विकास महामंडळाचे आभार मानले.