जगाला युद्ध नको, बुद्ध हवा !
By admin | Published: June 3, 2017 12:13 AM2017-06-03T00:13:24+5:302017-06-03T00:13:24+5:30
जगात सध्या सर्वत्र युद्धाची स्थिती सुरू आहे. परंतु आम्हाला युद्ध नको, बुद्ध हवा. बुद्धाच्या शिकवणीतून करूणा,
सोनाली देशपांडे : भजेपार येथे बुद्ध विहाराचे लोकार्पण
लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : जगात सध्या सर्वत्र युद्धाची स्थिती सुरू आहे. परंतु आम्हाला युद्ध नको, बुद्ध हवा. बुद्धाच्या शिकवणीतून करूणा, शांती, मैत्री मानव समाजात रूजवणे शक्य आहे. त्यामुळे बुद्धांच्या शिकवणुकीचा सर्वांनी अवलंब करावा, असे मार्गदर्शन तिरोड्याचे नगराध्यक्ष सोनाली देशपांडे यांनी केले.
भजेपार येथे सार्वजनिक बुद्ध विहाराचे लोकार्पण बुधवारी करण्यात आले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
उद्घाटन अध्यक्ष सोनाली देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जि.प. सदस्य रजनी कुंभरे होत्या. अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गेडाम, सरपंच भूमेश्वरी अंबुले, उपसरपंच टेकचंद बोपचे, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक जैराम वासनिक, मंदा वासनिक, सामाजिक कार्यकर्त्या वंदना चव्हाण, माजी उपसरपंच वसंत मडावी उपस्थित होते.
सुरूवातीला गावातील बौद्ध उपासक-उपासिका यांच्यातर्फे सकाळी बुद्ध वंदना व परित्रान पाठ घेण्यात आले. निळी फीत कापून विहाराचे उद्घाटन करण्यात आले व पंचशील ध्वज फडकविण्यात आले. प्रास्ताविक क्षयरोग विभागाचे वरिष्ठ पर्यवेक्षक पवन वासनिक यांनी केले. त्यांनी बुद्ध धम्मावर मार्गदर्शन करीत दिवंगत सत्यभामाबाई बळीराम वासनिक यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी बुद्ध जयंतीचा कार्यक्रम येथे साजरा करण्यात येतो. त्यामुळे गावाला एक चांगले सुशोभित बुद्ध विहार उपलब्ध व्हावे, याच उदार हेतूने बुद्ध विहाराचे बांधकाम सर्वांच्या सहकार्याने करण्यात आल्याची माहिती त्यांनी सांगितली.
अध्यक्षीय भाषणातून रजनी कुंभरे यांनी, भजेपार गावात करण्यात आलेले सदर काम लोकप्रतिनिधींनी करायला हवे होते. मात्र समाजातील काही बांधवांनी एकत्र येवून हे काम पूर्णत्वास नेले. त्याला वासनिक कुटुंबीयांनी मोलाचे सहकार्य केले व त्यामुळेच ही सुंदर वास्तू साकारली गेली, हे सर्वांसाठी प्रेरणास्पद आहे. आमच्यासारख्या वंचितांना न्याय देवून बाबासाहेबांनी समानतेचे हक्क दिले. याच समानतेची व मानवतेची शिकवण तथागत बुद्धांनी दिली. या विहारातून समता, स्वातंत्र, बंधुत्व व न्यायाची शिकवण ग्रामस्थांना मिळावी, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
यानंतर वासनिक परिवारातर्फे सामूहिक भोजनदानाचे कार्यक्रम पार पडले. संचालन अशोक मेश्राम यांनी केले. आभार अॅड. सुप्रिया वासनिक यांनी मानले. कार्यक्रमासाठी विक्रम वासनिक, सुमीत डोंगरे, टेकचंद बोपचे, देवचंद टेकाम, शिशुपाल रहांगडाले, भाऊजी बोपचे, दिलीप कोडवते, माणिक नागदेवे, शिवप्रसाद मेश्राम, सुरेश वासनिक, रवी वासनिक, संजय नागदेवे, परमानंद नागदेवे, यशवंत वासनिक, धम्मदीप चव्हाण, ईश्वर मेश्राम, दुर्योधन मेश्राम, मयपाल नागदेवे, अंजिरा नागदेवे, शकुंतला वासनिक, आनंद वासनिक, मनिष चंद्रिकापुरे, सिद्धार्थ मेश्राम, मीताराम नारनवरे आदींनी सहकार्य केले.