डेल्टापेक्षा भयंकर विषाणूने वाढविली चिंता, १५४ गावे लसवंत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2021 05:00 AM2021-12-01T05:00:00+5:302021-12-01T05:00:03+5:30
जिल्ह्यातील १५४ गावांतील नागरिकांनी लसीचा पहिला डोस शंभर टक्के घेतला असून, ही गावे लसवंत झाली आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ८९.५० टक्के नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला असून ३४ टक्के नागरिकांनी लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतला आहे. लसीचा पहिला डोस घेण्यापासून वंचित असलेल्या ११ टक्के नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभागाने पुढाकार घेतला आहे. ओमयाक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर लसीकरण वाढविण्यावर भर दिला जात आहे.
अंकुश गुंडावार
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनाची दुसरी लाट ओसरून परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच दक्षिण ऑफ्रिकेतील ओमयाक्रॉन या नवीन विषाणूने जगभराची झोप उडविली आहे. केंद्र व राज्य सरकारने याची गांर्भीयाने दखल घेतली असून सर्वांनाच अलर्ट राहण्याच्या सूचना करीत उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहे. राज्य शासनाच्या निर्देशानंतर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सुद्धा सजग झाली आहे. नव्या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी डबल मास्कचा वापर, वांरवार हात स्वच्छ धुणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन आणि कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण या गोष्टींकडे लक्ष देण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.
दोन्ही डोस घेतलेल्या १०० टक्के लसवंत गावांची संख्या वाढविण्यासाठी आरोग्य यंत्रणेने प्रयत्न सुरू केले आहे. जिल्ह्यातील १५४ गावांतील नागरिकांनी लसीचा पहिला डोस शंभर टक्के घेतला असून, ही गावे लसवंत झाली आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ८९.५० टक्के नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला असून ३४ टक्के नागरिकांनी लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतला आहे. लसीचा पहिला डोस घेण्यापासून वंचित असलेल्या ११ टक्के नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभागाने पुढाकार घेतला आहे. ओमयाक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर लसीकरण वाढविण्यावर भर दिला जात आहे. तसेच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी नयना गुंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी नितीन कापसे यांनी केले आहे.
अशी आहेत लक्षणे...
nकोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटची सामान्य लक्षणे म्हणजे ताप, कोरडा खोकला आणि थकवा.
nकोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटच्या तीव्र लक्षणांमध्ये छातीत दुखणे, धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे आदी लक्षणांचा समावेश आहे. याशिवाय त्वचेवर पुरळ उठणे, बोटांच्या रंगात बदल होणे यासारखी लक्षणे दिसून येतात. सामान्य लक्षणांमध्ये घसा खवखवणे, चव आणि गंध कमी होणे, डोकेदुखी व अतिसार यांचा समावेश आहे.
विदेशातून आले तर व्हावे लागेल क्वारंटाईन
nदक्षिण आफ्रिकेत डेल्टा पेक्षाही भयंकर विषाणू ओमक्रॉयन पसरल्याने त्या देशात निर्बंध लागू करण्यात आले आहे. भारतात केंद्र आणि राज्य सरकारने सुद्धा विदेशातून येणाऱ्या नागरिकांसाठी नवीन निर्बंध लागू केले आहे. तसेच जिल्ह्यांनादेखील विदेशातून येणाऱ्या नजर ठेवून त्यांना वेळीच क्वारंटाइन करण्याच्या सूचना केल्या आहे.
ओमायक्राॅन विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी अलर्ट राहून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. तसेच डबल सर्जिकल मास्कचा वापर करावा, वांरवार हात स्वच्छ धुवावे आणि कोरोना प्रतिबंधात्मक लस आवश्यक घ्यावी.
- नयना गुंडे, जिल्हाधिकारी
अशी घ्या काळजी...
- घराबाहेर पडताना दुहेरी मास्क वापरा
- अत्यावश्यक असेल तेव्हाच घराबाहेर पडा
- २० सेकंदांपर्यंत साबणाने हात स्वच्छ धुवा
- फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करा
- दोन व्यक्तींमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवा
- घर व आसपासचा परिसर स्वच्छ ठेवा
- परिसराचे निर्जंतुकीकरण करा