वनरक्षकांच्या सदनिकांची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 10:14 PM2018-11-26T22:14:23+5:302018-11-26T22:14:37+5:30
गोठणगाव वनक्षेत्रांतर्गत येत असलेल्या केशोरी, केळवद, तुकुमनारायण व उमरपायली या जंगल वेष्ठीत गावांमध्ये वन विभागाकडून वनांचे रक्षण करण्यासाठी कार्यरत असणाऱ्या वनरक्षकांना राहण्यासाठी बांधण्यात आलेल्या सदनिकांकडे शासनाचे दुर्लक्ष आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
केशोरी : गोठणगाव वनक्षेत्रांतर्गत येत असलेल्या केशोरी, केळवद, तुकुमनारायण व उमरपायली या जंगल वेष्ठीत गावांमध्ये वन विभागाकडून वनांचे रक्षण करण्यासाठी कार्यरत असणाऱ्या वनरक्षकांना राहण्यासाठी बांधण्यात आलेल्या सदनिकांकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. यामुळे या सदनिकांची दुरवस्था झाली असून त्या भग्नावस्थेत दिसून येत आहेत. परिणामी वनरक्षकांना सदनिका सोडून भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे.
जंगलाचे रक्षण व विकास करण्यासाठी वनविभागाने वनरक्षकांना राहण्यासाठी जंगलांना लागून असलेल्या अनेक गावांत लाखो रुपये खर्चुन सदनिका बांधलेल्या आहेत. बांधलेल्या सदनिकांकडे वनविभागाचे दुर्लक्ष झाल्यामुळे सदनिका भग्नावस्थेत अश्रू ढाळत आहेत. जंगलाचे रक्षण करण्यासाठी वनरक्षकांची अत्यंत महत्वाची भूमिका असते. त्यामुळे जंगल वेष्ठीत गावांमध्ये त्यांच्या राहण्यासाठी शासनाने सदनिका तयार केल्या आहेत. त्यांना जंगल परिसरात फेरफटका मारुन न्याहाळता यावे व जंगलाचे रक्षण करण्यासाठी त्यांना सोईचे व्हावे या उदात हेतूने संपूर्ण जंगलाची जबाबदारी सांभाळणाºया वनरक्षकांसाठी सदनिका बांधण्यात आल्या आहेत. त्या सदनिकांची स्थिती सध्या जीर्ण होवून काही भाग भग्न होवून पडत चाललेला आहे. यामुळे वनरक्षकांना भाड्याच्या घरता राहून आपली सेवा अर्जीत करावी लागत आहे.
सदनिकांच्या भिंती, दरवाजे, खिडक्या, कवेलू, फाटे अक्षरस: जीर्णावस्थेत असून कधीही कोसळण्याची भिती निर्माण झाली आहे.
या सदनिकांकडे वनविभागाचे मुळीच लक्ष दिसून येत नाही. यावरुन वनरक्षकांच्या सदनिकांविषयी वनविभागाची उदासीनता दिसून येते.