अरे वा... बाधितांपेक्षा मात करणाऱ्यांचा ग्राफ वाढतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:31 AM2021-04-28T04:31:54+5:302021-04-28T04:31:54+5:30
मंगळवारी जिल्ह्यातील तब्बल जिल्ह्यातील ८८५ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली, तर ५५५ नवीन रुग्णांची नोंद झाली. १२ बाधितांचा उपचारादरम्यान शासकीय ...
मंगळवारी जिल्ह्यातील तब्बल जिल्ह्यातील ८८५ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली, तर ५५५ नवीन रुग्णांची नोंद झाली. १२ बाधितांचा उपचारादरम्यान शासकीय व खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. मागील आठ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात ४७०० बाधितांची नोंद झाली. मात्र, ५५०० बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. दोन दिवसांपासून कोरोनाबाधितांचे आकडेसुद्धा कमी होत आहेत. जिल्हावासीयांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन केल्यास निश्चितच कोरोनाला जिल्ह्यातून हद्दपार करण्यास मदत होईल. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत १३१६६६ जणांचे स्वॅब नमुने तपासण्यात आले. त्यापैकी १०६५२९ जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. यात १३१९५३ नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ११४०२८ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३१४३६ कोरोनाबाधित आढळले असून, यापैकी २४७२१ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत ६२१९ काेरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून ६००४ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयाेगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
...............
प्रलंबित नमुन्यांचा आलेख कधी कमी होणार
गोंदिया येथील स्वॅब नमुने तपासणी प्रयोगशाळेतील तंत्रज्ञ व कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याने त्यांचे स्वॅब नमुने तपासणीच्या प्रक्रियेवर परिणाम झाला आहे. सद्य:स्थितीत ६००४ नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडे प्रलंबित आहे, तर काही ठिकाणी चाचण्या बंद आहेत. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत थोडी भर पडली आहे.
.......
जिल्ह्याला १३६४० डोस प्राप्त
कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी लसीकरण हा रामबाण उपाय असून, लसीकरण मोहीम व्यापक स्वरूपात राबविली जात आहे. मंगळवारी गोंदिया जिल्ह्याला कोविशिल्डचे १० हजार आणि कोव्हॅक्सिनचे ३६४० डोस प्राप्त झाले. त्यामुळे लसीकरण मोहिमेला पुन्हा गती प्राप्त होणार आहे.