यार्डातील धान असुरक्षित
By admin | Published: November 24, 2015 02:01 AM2015-11-24T02:01:28+5:302015-11-24T02:01:28+5:30
कृषी उत्पन्न बाजार समिती अर्जुनी-मोरगाव येथील उपबाजार नवेगावबांध येथे धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले.
नवेगावबांध : कृषी उत्पन्न बाजार समिती अर्जुनी-मोरगाव येथील उपबाजार नवेगावबांध येथे धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. परंतु येथील धानाच्या सुरक्षेची कसलीही व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे गोदामात खरेदी करून ठेवलेला धान असुरक्षित झाला आहे. जे शेतकरी आपल्या गावावरून धान घेवून येतात त्यांचे धान विक्रीपूर्वीच असे सुरक्षित झाल्यामुळे बाजार समितीच्या आणि त्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शासनाने कृषी उत्पन्न बाजार समितीत धान खरेदी केंद्र सुरू केले आहे. बाजार समितीकडून धान खरेदी केला जात आहे. या कामासाठी येथे दोन चौकीदार ठेवण्यात आले आहेत. ते समितीने खरेदी केलेल्या धानाची सुरक्षा सांभाळण्याची जबाबदारी सांभाळत आहेत.
याच ठिकाणी वेगळ्या भागात शासकीय हमीभाव धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रावर ज्या प्रमाणात धान विक्रीसाठी शेतकरी आणत आहेत, त्यामुळे सदर धानाचे वजन वेळेवर होवू शकत नाही. या प्रकाराने शेतकऱ्यांना मार्केट यार्डमध्येच आपले धान मोकळ्यावर सोडून घरी परतावे लागते. पण त्या धानाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
बाजार समितीकडून ठेवलेले चौकीदार कोणत्याही स्थितीत या धानाची जबाबदारी स्वीकारण्यास तयार नाहीत. अशात जर शेतकऱ्यांचे धान कमी झाले तर त्यासाठी जबाबदार कोण? धान खरेदी केंद्राच्या वतीने या धानाच्या सुरक्षेसाठी कसलीही सोय करण्यात आलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार १६ नोव्हेंबरपासून शनिवारी २१ नोव्हेंबरपर्यंत बाजार समितीच्या यार्डात सुरू धान खरेदी केंद्रावर दोन हजार ९७३ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. धान खरेदीनंतर येथे दरदिवशी जवळपास एक हजार ५०० पोती धान पडून राहतो. या उघड्यावर ठेवलेल्या धानाच्या सुरक्षेसाठी शेतकरी चिंतित आहेत. (वार्ताहर)