यंदा होळीत २८ हजार क्विंटल लाकडे स्वाहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 10:00 PM2019-03-20T22:00:50+5:302019-03-20T22:01:14+5:30
मोठ्या प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीमुळे ग्लोबल वार्मिंगचे संकट उभे आहे. या समस्येवर मात करण्यासाठी शासनाने पर्यावरण ग्राम संतुलीत योजना अंमलात आणली. या योजनेतून प्रत्येक गावाने रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावून शंभर कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केले. तर दुसरीकडे जुन्या वृक्षांची कत्तल करून ते होळीत स्वाहा केले जात आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मोठ्या प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीमुळे ग्लोबल वार्मिंगचे संकट उभे आहे. या समस्येवर मात करण्यासाठी शासनाने पर्यावरण ग्राम संतुलीत योजना अंमलात आणली. या योजनेतून प्रत्येक गावाने रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावून शंभर कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केले. तर दुसरीकडे जुन्या वृक्षांची कत्तल करून ते होळीत स्वाहा केले जात आहेत. यंदा होळीला जिल्ह्यात १३८७ सार्वजनिक व तर १४२० ठिकाणी खासगी होळ्या जाळल्या जात आहेत. यातील २८०७ होळींमध्ये २८ हजार ७० क्विंटल लाकडे जाळले गेली आहेत. या लाकडांची किंमत कोट्यवधी रुपयांच्या जवळपास आहे.
जिल्ह्यात बुधवारी (दि.२०) होलीका दहन तर गुरूवारी (दि.२१) धुळवड साजरी होत आहे. होळीचा सण उत्साहात व शांततेत पार पडावा यासाठी बुधवार व गुरूवारी (दि.२१) पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. यंदा शहर पोलीस ठाण्यांतर्गत शहर हद्दीत १३० सार्वजनिक व २४० खाजगी होळी, रामनगर पोलीस ठाणे हद्दीत ५५ सार्वजनिक होळी, गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत ५० सार्वजनिक होळी व १६० खाजगी होळी, रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत ७२ सार्वजनिक व १०८ खाजगी होळी, तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत १० सार्वजनिक व ७० खाजगी होळी, गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत ४८ सार्वजनिक व ६० खाजगी होळी, दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत ३५ सार्वजनिक होळी व २५ खाजगी होळी, आमगाव पोलीस ठाण्यांतर्गत ७२ सार्वजनिक होळी व ८८ खाजगी होळी, गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत १७० सार्वजनिक व ७० खाजगी होळींचे दहन होणार अहे. सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत १९० सार्वजनिक व ३० खाजगी होळी, देवरी पोलीस ठाण्यांतर्गत २३५ सार्वजनिक व २७ खाजगी होळी, चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत ५० सार्वजनिक व २० खाजगी होळी, केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत ३० सार्वजनिक व ३२५ खाजगी होळी, अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत ९० सार्वजनिक व ५२ खाजगी होळी, नवेगावबांध पोलीस ठाण्यांतर्गत ४५ सार्वजनिक व १० खाजगी होळी, डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत २५ सार्वजनिक व ५० खाजगी होळी अशा प्रकारे जिल्ह्यात एकूण १३८७ सार्वजनिक तर १४२० खाजगी होलीका दहन करण्यात आले. होळीचा सण शांततेत आणि निर्भय व मोकळ्या वातावरणात पार पाडण्याकरिता पोलीस दलातर्फे सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. अवैध दारु व्यवसायावर कारवाई करण्यासाठी पोलीस ठाणे स्तरावर तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक स्थापन करण्यात आले आहेत. एकीकडे पर्यावरण संतुलनासाठी वनविभागाबरोबर प्रत्येक ग्रामपंचायती सरसावल्या आहेत. मात्र त्याच गावातील नागरिक जंगलातील, शेतातील लाकडे तोडून कोट्यवधीची वनसंपदा होळीसाठी नष्ट केली जाते. आज घडीला एक क्विंटल लाकडाची किमत ८०० रुपये सांगितली जाते. या २८ हजार क्विंटल लाकडाची किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. वनाधिकारी व वनकर्मचाऱ्यांच्या उदासिनतेमुळे नागरिक जंगलातील लाकडे कापून होळीत जाळून आनंदोत्सव करतात. यामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ºहास होतो.
तंटामुक्त समित्या लक्ष ठेवणार
होळीला धार्मिक भावना दुखावल्या जातील असे पोस्टर्स, देखावे, चित्र, नाटके किंवा प्रक्षोभक घोषणा देणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन पोलिसांबरोबर महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांना देखील करण्यात आले आहे. होळीचा सण शांततेत पार पडावा यासाठी पोलिसांनी मोहल्ला कमिटी, ग्राम सुरक्षा दल व तंटामुक्त गाव समिती, पोलीस मित्र यांच्या बैठका घेतल्या आहेत. तंटामुक्त गाव समिती गावातील अवैध दारू बरोबर वाद घडवू नये यासाठी प्रयत्न केले जातील.
ट्रायकिंग फोर्सचा बंदोबस्त करणार
होळीच्या सणाला समाज कंटक, समाज विघातक, मुलतत्ववादी व गुंड प्रवृत्तीचे इसम मद्यप्राशन करून अश्लिल वक्तव्य करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी जिल्ह्यात ट्रायकिंग फोर्सचा बंदोबस्त लावला आहे. धार्मिक स्थळावर गुलाल उधळणे, मुलींची छेडखानी करणे, होळी प्रथम कुणी पेटवावे,एकमेकांच्या अंगावर गुलाल रंग, फुग्यांमध्ये पाणी भरुन मारणे, चिखल अंगावर टाकणे, ढोल-ताशे वाजवून नाचत गाजत फगवा काढणे, जुन्या वैनमस्यातून वाद निर्माण करणे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. यासाठी तंटामुक्त समितीची मदत घेणार आहेत.
‘‘सण आनंदात साजरा करण्यासाठी ‘इको फ्रेन्डली होळी’ अशा उपक्रम प्रत्येक गावात राबविला जाणे पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. वनांचे संरक्षण करून मानवाच्या उत्थानासाठी नैसर्गिक रंग खेळावा. लाकडे जाळणे टाळावे.
- एल.एस. भुते
क्षेत्र सहाय्यक, आमगाव.