यंदा पथसंचालनाची कमान महिलांकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 09:25 PM2018-04-28T21:25:24+5:302018-04-28T21:25:24+5:30
यंदा १ मे महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात संपूर्ण पथसंचालनाची कमान महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे असणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महिला लोकप्रतिनिधी व समाज सेविकांना प्राधान्य देण्याचा निर्णय जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांनी घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : यंदा १ मे महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात संपूर्ण पथसंचालनाची कमान महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे असणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महिला लोकप्रतिनिधी व समाज सेविकांना प्राधान्य देण्याचा निर्णय जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांनी घेतला आहे. अशा प्रकारचा उपक्रम प्रथमच जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
महिलांनी त्यांच्या कार्य कर्तुत्वाच्या बळावर सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे. शिवाय कुठल्याही क्षेत्रात महिला मागे नसल्याचे त्यांच्या कौशल्यातून दाखवून दिले आहे. मात्र अद्यापही महिलांना काही ठिकाणी दुय्यम वागणूक दिली जाते. त्यामुळे महिलांचा आत्मविश्वास कमी होतो. जिल्हा पोलीस अधीक्षक भुजबळ पाटील यांनी हीच बाब हेरून महिलांचा सन्मान करण्यासाठी व त्यांच्यातील आत्मविश्वास अधिक बळकट करण्यासाठी १ मे महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात पथसंचालनासह कार्यक्रमाच्या सर्वच आयोजनाची जबाबदारी महिला अधिकारी व कर्मचाºयांकडे देण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे यंदा १ मे महाराष्ट्र दिनी कारंजा येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी पथसंचालन करताना दिसणार आहेत.
या कार्यक्रमाला महिला लोकप्रतिनिधी, समाजसेविका व विविध क्षेत्रात कार्यरत महिलांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रीत केले आहे. तसेच महिला पोलीस कर्मचाऱ्यांकडून विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थिनीना आत्मरक्षणाचे धडे देण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक भुजबळ पाटील यांनी सांगितले.