ऊन-पावसाचा खेळ सुरू, मंगळवारपर्यंत जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’
By कपिल केकत | Published: April 21, 2023 05:02 PM2023-04-21T17:02:19+5:302023-04-21T17:03:36+5:30
गुरुवारच्या पावसानंतर तापमानात घट : शुक्रवारी पारा ४१.५ अंशांवर
गोंदिया : हवामान खात्याने बुधवारी व गुरुवारी पावसाचा इशारा देत जिल्ह्याला यलो अलर्ट दिला होता. त्यानुसार, गुरुवारी (दि. २०) सायंकाळी पावसाने हजेरी लावली व त्यामुळे शुक्रवारी (दि. २१) जिल्ह्याचा पारा घसरला व तापमान ४१.५ अंशांवर आले होते. मात्र, आता हवामान खात्याने थेट मंगळवारपर्यंत (दि. २५) जिल्ह्याला यलो अलर्ट दिला आहे.
मार्च महिन्यात होळी आली व तेव्हापासूनच जिल्ह्यात ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. एवढेच नव्हे, तर एप्रिल महिन्याची सुरुवातही अशीच झाली असून, अवकाळी व गारपीटही जिल्ह्यात झाली. ऊन-पावसाचा हा खेळ अद्यापही संपलेला नसून आताही ‘कभी धूप तो कभी छाव’ अशी स्थिती कायम आहे. मात्र, मागील आठवडाभरापासून वातावरण स्वच्छ झाले व उन्हाची तीव्रता वाढल्याने जिल्ह्याचा पारा थेट ४३.५ अंशांवर गेला होता. यातच गुरुवारी (दि. २०) गोंदिया जिल्हा विदर्भात दुसऱ्या क्रमांकावर होता. मात्र, हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार गुरुवारी सायंकाळी अचानकच पावसाने हजेरी लावली. काही काळ का असेना मात्र बरसलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. यामुळेच शुक्रवारी (दि. २१) तापमानात घट दिसून आली व पारा ४१.५ अंशांवर आला.
पाचही दिवस परत पावसाचे
- अगोदर हवामान खात्याने गुरुवारपर्यंत पावसाचा इशारा दिला असतानाच शुक्रवारी परत एकदा मंगळवारपर्यंत (दि. २५) पावसाचा इशारा दिला असून, जिल्ह्याला यलो अलर्ट दिला आहे. गुरुवारी झालेल्या पावसानंतर तापमानात घट दिसली. मात्र, दिवसभर ऊन तापले व त्यामुळे जिल्हावासीयांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागला. अशात आता पुढील पाच दिवस पावसाचा इशारा असतानाच सलग पाच दिवस पाऊस पडावा, अशी अपेक्षा जिल्हावासीय करीत आहेत.