साहेब मजुरांच्या हाताला रोजगार द्या हो !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:21 AM2021-04-29T04:21:29+5:302021-04-29T04:21:29+5:30
सडक अर्जुनी : सध्या देशात कोरोनाचे थैमान सुरू आहे. परिणामी, सर्वत्र लॉकडाऊनची स्थिती असून उद्योगधंदे बंद असल्याने मजुरांच्या ...
सडक अर्जुनी : सध्या देशात कोरोनाचे थैमान सुरू आहे. परिणामी, सर्वत्र लॉकडाऊनची स्थिती असून उद्योगधंदे बंद असल्याने मजुरांच्या हातालासुध्दा काम नाही मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे साहेब मजुरांच्या हाताला काम द्या हो, अशी आर्त हाक ते देत आहेत.
एकीकडे हाताला काम व कामाचे दाम देण्यासाठी शासनाने विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत, पण अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रातील सहवनक्षेत्र कार्यालय डोंगरगाव डेपोअंतर्गत कंपार्टमेंट नंबर ५७४/७५ मध्ये गेल्या दोन दिवसांपूर्वी जे. सी. बी. मशीनच्या सहायाने वनविभागाने एका योजनेच्या माध्यमातून २ लाख ४० हजार रुपयांचा निधी खर्च करून नाला सरळीकरणाचे काम केले. यासंदर्भात वनरक्षकाला विचारले असता हे काम जेसीबीने करण्याबाबत अंदाजपत्रकात नमूद असल्याचे सांगितले. डोंगरगाव डेपो परिसरात मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे मिळेल ते काम करण्यासाठी आतुरतेने वाट बघत आहेत. तर दुसरीकडे, अधिकारी यंत्रसामग्रीच्या माध्यमातून कामे करीत असल्याने मजुरांच्या हाताला काम मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन मजुरांच्या हाताला कसा रोजगार मिळेल, या दृष्टिकोनातून काम करण्याची गरज आहे.
.....
कोट
शासनाच्या परिपत्रकानुसार २ लाखांपर्यंतची कामे यंत्राच्या माध्यमातून करता येतात. हेच काम मजुरांचे हातून केले तर खर्च जास्त येतो, त्यामुळे ही कामे यंत्राच्या साह्याने केले जात आहेत.
-प्रदीप पाटील,
सहायक वनसंरक्षक
गोंदिया