‘होय आम्ही शिकणार’ सर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:29 AM2021-09-19T04:29:50+5:302021-09-19T04:29:50+5:30
गोंदिया : कोरोना या जागतिक महामारीच्या प्रादुर्भावामुळे सर्वच विद्यार्थ्यांच्या नियमित शिक्षणामध्ये बाधा निर्माण झाली आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव विद्यार्थ्यांना शाळेपासून ...
गोंदिया : कोरोना या जागतिक महामारीच्या प्रादुर्भावामुळे सर्वच विद्यार्थ्यांच्या नियमित शिक्षणामध्ये बाधा निर्माण झाली आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव विद्यार्थ्यांना शाळेपासून दूर राहावे लागत आहे. अशा संकटकालीन परिस्थितीत एकही मूल शिक्षणापासून वंचित, शाळाबाह्य राहणार नाही यासाठी शाळाबाह्य बालकांना शाळेत दाखल करणे व कोविड-१९ मुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे झालेले अध्ययन नुकसान भरून काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना वरिष्ठ कार्यालयामार्फत समग्र शिक्षा, जि. प. गोंदियाला प्राप्त झाल्या आहेत. २४ फेब्रुवारी २०२१ अन्वये विशेष शोधमोहीम राबवून ६८९ बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात यश आले आहे.
कोविड-१९ या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर शाळाबाह्य बालकांचा विषय संवेदनशील झालेला आहे. या संवेदनशील परिस्थितीतही गोंदिया जिल्ह्यात एकही मूल शाळाबाह्य राहू नये याकरिता समग्र शिक्षा नेहमीच प्रयत्न करते. सन २०२०-२१ मध्ये शाळाबाह्य बालक शिक्षणाच्या प्रवाहात यावेत हे ध्येय ठेवून बालरक्षक विभाग, समग्र शिक्षा अंतर्गत चेकपोस्टवर लिंकद्वारे स्थलांतरित बालकांची माहिती घेऊन ३०६ बालकांना नियमित शाळेत दाखल केले. एक गाव एक बालरक्षक, मिशन शिक्षण हमी पत्रक, अस्थायी कुटुंबातील बालकांची शोधमोहीम मिशन वीटभट्टी, शाळाबाह्य बालक विषयावर आधारित ऑनलाईन कविसंमेलन घेण्यात आले आहे. १ जून २०२१ ला जागतिक पालक दिनानिमित्त सर्व पालकांना आवाहन पत्रामार्फत शाळेत दाखल करण्याबाबत प्रोत्साहित करण्यात आले.
.......
बालरक्षकांची होतेय मदत
या उपक्रमामुळे एकाच दिवशी ३८५६ बालकांना इयत्ता पहिलीमध्ये दाखल करण्यात आले. २८ जून २०२१ ला ‘होय आम्ही शिकणार’ या उपक्रमाद्वारे १०० टक्के पटनोंदणी करण्यात आली. मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व बालरक्षक यांना समग्र शिक्षामार्फत आवाहन पत्र पाठविण्यात आले. त्यामुळे इयत्ता पहिलीमध्ये १३ हजार ८६७ विद्यार्थी दाखल झाले. मागील वर्षी १२ हजार ३५९ विद्यार्थी दाखल झाले होते. यावर्षी मागील वर्षीच्या तुलनेत ११३६ विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे. बजेट २०२१-२२ नुसार ८५ बालके शाळाबाह्य आढळली आहेत.