‘एवढ्या मजुरीत तेलही मिळत नाही साहेब !’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 05:00 AM2021-02-17T05:00:00+5:302021-02-17T05:00:17+5:30
सालेकसा तालुक्यात दरवर्षी सरासरी तीन हजार हेक्टरच्यावर शेतीत उन्हाळी धान पीक घेतले जात असते. अर्थात खरीप हंगामाच्या तुलनेत फक्त २० टक्के शेती रब्बीच्या हंगामासाठी उपयोगात आणली जाते. परंतु यंदा रब्बी हंगामाचे प्रमाण फारच कमी असून कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात एकूण ११७६ हेक्टरवरच उन्हाळी धान पीक घेतले जात आहे.
विजय मानकर
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : सध्या जिल्ह्यात सर्वत्र उन्हाळी धान पीक घेण्यासाठी रोवणीची कामे सुरू आहे. धान रोवणी करताना दिवसभर चिखलात राहून रोवणी करणाऱ्या महिला मजुरांची मोठी आर्थिक पिळवणूक होत आहे. दिवसभराच्या मजुरीचे पैसे हाती घेताना अनेक महिला मजुरांच्या मुखातून एकच वाक्य निघते ते म्हणजे, एवढ्या मजुरीत तर तेलही मिळत नाही तर मग बाकीचा खर्च कुठून करायचा?, असा सवाल करीत आहे.
सालेकसा तालुक्यात दरवर्षी सरासरी तीन हजार हेक्टरच्यावर शेतीत उन्हाळी धान पीक घेतले जात असते. अर्थात खरीप हंगामाच्या तुलनेत फक्त २० टक्के शेती रब्बीच्या हंगामासाठी उपयोगात आणली जाते. परंतु यंदा रब्बी हंगामाचे प्रमाण फारच कमी असून कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात एकूण ११७६ हेक्टरवरच उन्हाळी धान पीक घेतले जात आहे. त्यात ८०० हेक्टरवर धरणाच्या पाण्यातून आणि उर्वरित जमिनीवर खासगी बोअरवेलच्या पाण्याद्वारे रब्बीची भात लागवड केली जात आहे. खरीप हंगामाच्या तुलनेत केवळ ७.५० टक्के शेतीवरच लागवड होत आहे. बोअरवेलधारक शेतकऱ्यांनी जानेवारी महिन्यातच आपल्या शेतात धान रोवणी करवून घेतली असून त्यांना मोठ्या प्रमाणावर महिला मजूर उपलब्ध झाले. घरी बसण्याऐवजी जेवढी काही मजुरी मिळेल या अपेक्षेने सहज धान रोवणीसाठी उपलब्ध झाले. शेतकऱ्यांनी शेतात रोवणी करवून प्रती दिवस फक्त १०० रूपये प्रमाणे मजुरीची रक्कम मोजली. साहेब १०० रूपयात तर तेल सुद्धा मिळत नाही. आहारात वापरण्यासाठी लागणारे तेल सुद्धा १३० ते १५० रूपये लिटरप्रमाणे खरेदी करावे लागत असते. त्यावर खाद्य पदार्थ अन्न, किराणा आणि दररोजची जेवणाची व्यवस्था कशी करावी. एखादे कुटुंब एका महिला मजुराच्या भरवशावर असेल तर ती महिला आपल्या कुटुंबाचा गाडा कसा पुढे नेणार हा सुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे. फेब्रुवारी महिन्यात धरणातून येणाऱ्या कालव्याच्या पाण्याद्वारे धान रोवणी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली तेव्हा रोवणीसाठी मजुरांची काही मागणी वाढली तेव्हा मजुरांनी आपल्या व्यथा मांडत मजुरी वाढविण्याची मागणी केली. शेतमालकांनी मजुरीचे दर १०० रूपयावरून ११० ते १२० रूपयापर्यंत केले. परंतु १२० रूपये सुद्धा मुळीच परवडणारी मजुरी नाही असे सांगितले.
महिला, पुरूषांच्या मजुरीत मोठी तफावत
शेतीमध्ये काम करणाऱ्या महिला मजुराला दिवसभर काम करण्याची मजुरी फक्त १०० ते १२० रूपयेपर्यंत मिळत आहे. त्यावेळी पुरूष मजुराला २५० ते ३०० रूपये प्रमाणे दिले जाते. अशात महिलांपेक्षा पुरूषाला दुप्पट मजुरी का दिली जाते. अशा प्रश्न मजूर वर्गासमोर नेहमी उभा राहतो. महिलासुद्धा दिवसभर चिखलात राहून राबत असतात. त्यांनासुद्धा किमान २०० ते २५० रूपयेपर्यंत मजुरी मिळावी ही अपेक्षा आहे. पण ते ऐकणार कोण हा प्रश्न आहे.
आठ तास विजेचा मोठा फटका
महावितरण कंपनीने शेतकऱ्यांसाठी एकूण २४ तासांपैकी फक्त आठ तास वीज पुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे आठ तासाच्या विद्युत पुरवठ्यामुळे मोटार पंप लावून रब्बी धान पीक घेणे शक्य नाही. अशात अनेक शेतकऱ्यांनी यंदा रबी धान पीक घेण्याचे टाळले. परिणामी यंदा सरासरीपेक्षा फक्त २० टक्के शेतीमध्येच रबी धान पीक घेतले जात आहे. त्यामुळे मजुरांची मागणीसुद्धा घटली आहे.