रेल्वेत बसल्यानंतरही मिळणार आरक्षित तिकीट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2022 05:00 AM2022-03-16T05:00:00+5:302022-03-16T05:00:21+5:30
रेल्वे हॅन्ड हेल्ड टर्मिनल (एचएचटी) ही नवीन प्रणाली विकसित केली आहे. हॅन्ड हेल्ड टर्मिनल हे छोटेशे यंत्र आता टीसीला दिले जाणार आहे. यामुळे टीसीला गाडीत आरक्षित चार्ट घेऊनसुद्धा फिरण्याची गरज भासणार नाही. यामुळे कागदाची सुध्दा बचत होणार असून पर्यावरणाचे संवर्धन करण्यास मदत होणार आहे. सध्या ही सुविधा राजधानीसह काही गाड्यांमध्ये सुरू करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आपण रेल्वेतून प्रवास करीत आहात आणि आपली तिकीट आरक्षित झाली नसेल तरी आता फारशी काळजी करण्याची गरज नाही. गाडीतील टीसीशी संपर्क साधून पुढील ज्या स्थानकावरून आरक्षित तिकीट मिळू शकेल याची माहिती प्रवाशांना मिळणार आहे. यासाठी रेल्वे हॅन्ड हेल्ड टर्मिनल (एचएचटी) ही नवीन प्रणाली विकसित केली आहे. हॅन्ड हेल्ड टर्मिनल हे छोटेशे यंत्र आता टीसीला दिले जाणार आहे. यामुळे टीसीला गाडीत आरक्षित चार्ट घेऊनसुद्धा फिरण्याची गरज भासणार नाही. यामुळे कागदाची सुध्दा बचत होणार असून पर्यावरणाचे संवर्धन करण्यास मदत होणार आहे. सध्या ही सुविधा राजधानीसह काही गाड्यांमध्ये सुरू करण्यात आली आहे. पण दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागात याची अद्यापही अंमलबजावणी करण्यात आली नाही. हॅन्ड हेल्ड टर्मिनल (एचएचटी) हे मशीन रेल्वे बोर्डाकडून मिळाल्यानंतर याची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना पुढील स्थानकावरून आरक्षित तिकिट उपलब्ध असल्यास ती गाडीतूनच आरक्षित करता येणार आहे.
गोंदियाला मिळणार ८५ हॅन्ड हेल्ड टर्मिनल मशीन
रेल्वे विभागाने प्रवाशांच्या विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यास सुरुवात केली आहे. याच अंतर्गंत गाडीतच आरक्षित तिकीट बुकींग करण्याची सुविधा हॅन्ड हेल्ड टर्मिनल सिस्टिम अंतर्गत उपलब्ध करून दिली जाणार आहे. हॅन्ड हेल्ड टर्मिनल हे मशीन गाडीतील टीसीकडे असणार आहे. या मशीनच्या मदतीने टीसी कोणत्या रेल्वे स्थानकावरून आरक्षित तिकीट उपलब्ध होऊ शकेल याची माहिती देणार आहे. त्यामुळे प्रवासा दरम्यान आरक्षित तिकीट प्रवाशांना बुक करता येणार असल्याने त्यांची होणारी गैरसोय दूर होणार आहे.
हॅन्ड हेल्ड टर्मिनल (एचएचटी) या मशिनमध्ये गाडीच्या आरक्षित जागांची संपूर्ण माहिती असणार आहे. तर काही रेल्वे स्थानकांना आरक्षित तिकिटांचा कोटा ठरवून दिला असून बरेचदा तो रिकामा असतो. मात्र, एचएचटीच्या मदतीने गाडीतून प्रवास करताना कोणत्या स्थानकावरून आरक्षित तिकीट मिळू शकेल याची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. माहिती मिळताच ऑनलाईन आरक्षित तिकीट बुकींग करता येणार आहे.
हॅन्ड हेल्ड टर्मिनल (एचएचटी) या प्रणालीची अंमलबजावणी करण्याबाबत बोर्डाकडून आदेश आणि मशीन उपलब्ध झाले नाहीत. गोंदियाला ८५ मशीन मिळणार आहेत. यासंदर्भातील निर्देश मिळताच अंमलबजावणी केली जाईल.
- ए. के.रॉय, जनसंपर्क अधिकारी
प्रवाशांची अडचण हाेणार दूर
हॅन्ड हेल्ड टर्मिनल (एचएचटी) या प्रणालीची अंमलबजावणी झाल्यानंतर प्रवाशांना प्रवास दरम्यान गाडीत तिकीट आरक्षित करणे शक्य होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना तिकीट आरक्षित करण्यासाठीचा थोडा मनस्तापसुध्दा कमी होणार आहे.
हॅन्ड हेल्ड टर्मिनल (एचएचटी) या प्रणालीची अंमलबजावणी रेल्वे बोर्डाकडून लवकरच केली जाणार आहे. हे मशीन उपलब्ध झाल्यानंतर याची अंमलबजावणी केली जाणार आहे. सुरुवातीला काही एक्सप्रेस गाड्यांमध्ये ही सुविधा सुरू केली जाणार आहे.