शासकीय वसतिगृहासाठी अर्ज केला तरच मिळणार 'स्वाधार'चा लाभ !
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 03:14 PM2024-08-17T15:14:18+5:302024-08-17T15:16:32+5:30
Gondia : वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्यांनाच मिळेल योजनेचा फायदा
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील मुला- मुलींप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा करण्यात येते; परंतु स्वाधार योजनेचा लाभ घेण्याअगोदर शासकीय वसतिगृहाच्या प्रवेशासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. कारण ज्यांना वसतिगृहात प्रवेश मिळाला नसेल त्यांनाच 'स्वाधार'चा लाभ घेता येईल.
वर्ष २०२४-२५ या वर्षासाठी गोंदिया जिल्ह्यात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याकरिता संकेतस्थळ सुरू करण्यात आले असून अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून अर्जाची प्रत सहायक आयुक्त, समाजकल्याण, गोंदिया येथे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात ८ वसतिगृहे, ८०० हजारांवर जागा
गोंदिया जिल्ह्यात एकूण ८ शासकीय मुला मुलींची वसतिगृहे आहेत. त्यापैकी एक वसतिगृह नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांचे आहे. सर्व मिळून ८०० जागा आहेत.
व्यावसायिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ३० ऑगस्टची मुदत
अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील मुला-मुलींप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी व्यावसायिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अर्ज करण्याची मुदत ३० ऑगस्टपर्यंत देण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयामागे गोंदिया येथे संपर्क साधावा.
अर्ज केला तरच मिळेल लाभ
शासकीय वसतिगृहात ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही, त्यांनाच स्वाधार योजनेचा लाभ मिळतो. त्यामुळे स्वाधार चा लाभ घ्यायचा असेल तर वसतिगृहासाठी अर्ज करावा लागेल.
महाआयटी पोर्टलवर करा अर्ज
वर्ष २०२४-२५ या वर्षासाठी https://hmas.mahait.org या पोर्टलद्वारे नागपूर जिल्ह्यात MahalT शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे.
"स्वाधार योजनेचा लाभ घेण्याअगोदर शासकीय वसतिगृहाच्या प्रवेशासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. कारण ज्यांना वसतिगृहात प्रवेश मिळाला नसेल त्यांनाच स्वाधार' चा लाभ घेतो येईल."
- विनोद मोहतुरे, विशेष समाज कल्याणचे सहायक आयुक्त गोंदिया,