गोंदियात लंडनहून परतला एक युवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 05:00 AM2020-12-25T05:00:00+5:302020-12-25T05:00:27+5:30
खबरदारीचा उपाय म्हणून या युवकाचे स्वॅब नमुने घेवून आरटीपीसीआर टेस्ट गोंदिया येथील प्रयोगशाळेत गुरुवारी (दि.२४) करण्यात आली. तसेच पुणे येथील प्रयोगशाळेकडे स्वॅब नमुने पाठविण्यात आले आहे. याचा अहवाल शुक्रवारी सकाळपर्यंत जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त होणार आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नवीन प्रकाराचे रुग्ण आढळले असून संसर्ग वेगाने वाढत आहे. त्यामुळे जगभरात पुन्हा खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभुमीवर ब्रिटनमधून परतणाऱ्यांवर बारीक नजर ठेवली जात आहे. दहा दिवसांपूर्वी गोंदिया येथील एक रहिवासी युवक लंडनहून परतला. याची माहिती आरोग्य यंत्रणेला कळताच त्यांनी या युवकाला रुग्णालयात क्वारंटाईन करुन ठेवले आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून या युवकाचे स्वॅब नमुने घेवून आरटीपीसीआर टेस्ट गोंदिया येथील प्रयोगशाळेत गुरुवारी (दि.२४) करण्यात आली. तसेच पुणे येथील प्रयोगशाळेकडे स्वॅब नमुने पाठविण्यात आले आहे. याचा अहवाल शुक्रवारी सकाळपर्यंत जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त होणार आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
विशेष म्हणजे लंडनहून गोंदिया येथे परतलेल्या युवकाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ठेवण्यात आले असून त्याच्यावर आरोग्य विभागाची नजर आहे. या युवकाच्या स्वॅब नमुन्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याला २८ दिवस गृहविलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला जाणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. लंडनहून एक युवक गोंदिया येथे परतल्याची माहिती शहरात पसरातच शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आरोग्य विभागाने वेळीच पाऊल उचलले आहे.
तो युवक येण्यापूर्वीच ते कुटुंबीय कोरोना पॉझिटिव्ह
इंग्लंडहून एक कोरोना पॉझिटिव्ह युवक गोंदिया येथे आला आणि तो नागपूर परतल्याची अफवा सोशल मीडियावरुन गुरुवारी जोरात पसरविण्यात आली. या संदर्भात आरोग्य विभागाकडे विचारणा केली असता इंग्लंडहून परतलेला नागपूर येथील एक युवक आठ दिवसांपूर्वी गोंदिया येथे विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी गोंदिया येथील एका कुटुंबाकडे आला होता. मात्र हा युवक ज्या कुटुंबाकडे आला होता ते कुटुंब आधीच कोरोना पॉझिटिव्ह होते. त्यानंतर हा युवक नागपूरला परतल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आला. या युवकाला गोंदिया येथून परल्यानंतर कोरोनाची लागण झाल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.