तरुणांनो, थोडा धीर धरा, वडीलधाऱ्यांना द्या प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 05:00 AM2021-05-13T05:00:00+5:302021-05-13T05:00:24+5:30
जिल्ह्यात मंगळवारपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला गती मिळाली होती. नऊ हजारांवर डोस यासाठी प्राप्त करून देण्यात आले होते. मात्र १ लाख ५३ हजार २२६ नागरिक दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत होते; तर प्रत्येक जिल्ह्यात हेच चित्र होते. दुसरीकडे लसींचा पुरवठा अद्यापही वाढविण्यात आला नाही. त्यामुळे १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण काही दिवस बंद ठेवून दुसऱ्या डोस देण्यावर भर देण्याचे शासनाचे निर्देश आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी सध्या प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर दिला जात आहे. लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात करण्यात आली होती. मात्र लसींचा अपुरा पुरवठा व दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांची संख्या अधिक असल्याने शासनाने सर्व जिल्ह्यांना बुधवारपासून १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण थांबविण्याचे निर्देश देत दुसऱ्याचे डोसचे लसीकरण वाढविण्याचे आदेश दिले. त्यामुळे ‘तरुणांनो, थोडा धीर धरा, वडीलधाऱ्यांना प्राधान्य द्या,’ अशीच स्थिती होती.
जिल्ह्यात मंगळवारपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला गती मिळाली होती. नऊ हजारांवर डोस यासाठी प्राप्त करून देण्यात आले होते. मात्र १ लाख ५३ हजार २२६ नागरिक दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत होते; तर प्रत्येक जिल्ह्यात हेच चित्र होते. दुसरीकडे लसींचा पुरवठा अद्यापही वाढविण्यात आला नाही. त्यामुळे १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण काही दिवस बंद ठेवून दुसऱ्या डोस देण्यावर भर देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यामुळे बुधवारपासून जिल्ह्यातील सर्वच केंद्रांवर या वयोगटातील नागरिकांना लसीकरण बंद करण्यात आले.
विशेष म्हणजे या वयोगटातील नागरिकांचा लसीकरणाला प्रतिसाद वाढत असतानाच लसीकरण बंद करण्यात आल्याने युवकांचा हिरमोड झाला. मात्र पहिला डोस घेतल्यानंतर अनेकांना दुसरा डोस घेण्याचा कालावधी लोटून गेल्यानंतर लसींच्या तुटवड्यामुळे डोस घेता आला नव्हता. त्यामुळे दीड लाखावर नागरिक दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत होते. आता शासनाच्या नवीन निर्णयाने ४५ वर्षांवरील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
काेव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्डचे डोस झाले प्राप्त
आरोग्य विभागाने ४५ वर्षांवरील नागरिकांना दुसरा डोस देण्यासाठी आता कंबर कसली आहे; तर शासनाकडूनही यासाठी डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. बुधवारी जिल्ह्याला कोविशिल्डचे १८ हजार ५०० आणि कोव्हॅक्सिनचे १७०० डोस प्राप्त झाले आहे. या डोसचे बुधवारी सायंकाळीच सर्व केंद्राना वाटप करण्यात आले. त्यामुळे लसीकरणासाठी डोसचा तुटवडा नसल्याचे लसीकरण अधिकारी डॉ. भूमेश पटले यांनी सांगितले.
१४० केंद्रांवर सुरू होणार लसीकरण
आज, गुरुवारपासून जिल्ह्यातील सर्व १४० केंद्रांवर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केले जाणार आहे. या सर्व केंद्रांवर ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोनाचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. जवळपास १ लाख ५३ हजार २२६ नागरिक दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असून, आता या सर्वांना दिलासा मिळाला आहे.
लसीकरणात ज्येष्ठांची आघाडी
जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ८९ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यात सर्वांत पुढे ज्येष्ठ नागरिक असून ६७५४६ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली आहे; तर ४५ वर्षांवरील ६५३२४ नागरिकांनी कोरोनाची लस घेतली आहे. १८ ते ४४ वयोगटातील ५६४३ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे.