युवा पिढीने वृद्धांचासुद्धा विचार करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 10:59 PM2019-06-17T22:59:05+5:302019-06-17T22:59:17+5:30
आमच्या पूर्वीचे पूर्वज हे वृद्ध होवून गेले आता आमचे आजोबा, आजी, आई-वडील वृद्ध आहेत. काही वर्षानी आपणही वयोवृद्ध होणार आहोत.
लोकमत न्यूज नेटवर्क
काचेवानी : आमच्या पूर्वीचे पूर्वज हे वृद्ध होवून गेले आता आमचे आजोबा, आजी, आई-वडील वृद्ध आहेत. काही वर्षानी आपणही वयोवृद्ध होणार आहोत.
पूर्वजांपासून आजपर्यंत परिस्थितीचा विचार केल्यास आजच्या काळात वयोवृद्धावर खूप अत्याचार होताना दिसून येत आहेत. परिणामी आज अनेक वयोवृद्ध वृद्धाश्रमात, मंदिरात भटकंती करताना आढळतात. आज जे वयोवृद्ध आहेत ते जेव्हा तरुण होते, आम्ही त्यांची लेकरं होतो. आई-वडीलांनी लहानाचे मोठे केले. पालन पोषण, शिक्षणाकरिता रात्रेंदिवस एक करुन कष्ट केले, त्यांनीच रोजगारावर लावले.
पण आज तेच वयोवृद्ध परिवाराला डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आजच्या युवा पिढीने आपल्या वृध्दापकाळाचा विचार करावा असे आवाहन डॉ.एल.एन.खडगी यांनी केले.
तिरोडा तालुक्यातीेल बेरडीपार (काचेवानी) येथे अदानी फाऊंडेशन व हेल्पेज इंडियाच्या माध्यमातून जागतिक वयोवृद्ध अत्याचार जागरुकता दिवस कार्यक्रम शनिवारी आयोजित करण्यात आला होता. या वेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच ज्योत्सना टेंभेकर होत्या. या वेळी प्रामुख्याने माजी तंमुस अध्यक्ष धनराज पटले, नारायण पटले, नामेश्वर कटरे, शांता टेंभेकर, योगेश्वरी पारधी, दुर्गा कटरे, देवदास टेंभेकर, सुखदेव बिसेन, डॉ.एल.एन.खडगी, एसपीओ सचिन कुटीर आणि राहूल चनकापुरे, विवेक राऊत, स्नेहा तितीरमारे, संदीप अंबुले व मनोहर भोयर उपस्थित होते. जागतिक वयोवृद्ध अत्याचार जागरुकता संबंधीत उपस्थितांना माहिती देण्यात आली. डॉ.खडगी म्हणाले, प्रत्येक घरच्या सुनेने सासऱ्या, सासुला आपले आई-वडील समजून घ्यायला पाहिजे तर सासू-सासऱ्यांनी आपल्या सुनेला मुलगी समजून घेण्याची गरज आहे.वयोवृद्धावर आज आपण अत्याचार करतो, हीच वेळ काही दिवसांनी आपल्यावर येणार आहे. त्यामुळे घरातील वयोवृध्दांना सन्मानाची वागणूक देण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे संचालन संदीप अंबुले यांनी केले तर आभार मनोहर भोयर यांनी मानले. कार्यक्रमाला गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-तर वयोवृद्धावरील अत्याचार थांबतील
आपल्या आई-वडीलांनी आपल्याकरिता कोणते परिश्रम घेतले, याचा विचार युवा-पिढीने करण्याची गरज आहे. आपण होतो म्हणून बाहेरची मुलगी घरी आली, मुलीने (सुनेने) समजून घ्यावे, वयोवृद्ध सासू-सासºयाच्या कारणाने या घरी आलो. हेच आपले आई-वडील आहेत. लहान असताना त्यांची सांभाळून घेण्याची वेळ होती आज ते वयोवृध्द झाले आहेत. त्यामुळे त्यांचा सांभाळ व काळजी घेण्याचीे आता आमची वेळ आहे, अशी भावना प्रत्येक कुटुंबात निर्माण झाल्यास वयोवृध्दांवरील अत्याचार पूर्णपणे बंद होतील असे मत उपस्थित मान्यवरांनी या वेळी व्यक्त केले.